

मुंबई : अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्याची मोहीम परिवहन विभागाने हाती घेतली आहे. राज्यात गेले काही दिवसांत झालेल्या गंभीर अपघातांमुळे प्रशासन सक्रिय झाले आहे. या कारवाईमुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
कल्याण-मुरबाड महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला होता. कल्याणकडून अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी आणि मिक्सरची धडक झाली. या अपघातात चारचाकी वाहनातील ११ प्रवाशांचा मृत्यू झाला.
विविध ठिकाणी तपासणी नाके
या घटनेनंतर राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकांकडून विविध ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. यामध्ये परवान्याविना धावणारी प्रवासी वाहने, अवजड वाहनांद्वारे नियमभंग, तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शेअर टॅक्सी, रिक्षामधून अनधिकृतपणे वाहतूक होत आहे. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असल्याकडे मात्र परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
अनधिकृत वाहतुकीमुळे जीवितहानी
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच चालकांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान, काही अपघातांमध्ये अनधिकृत वाहतुकीमुळे जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा वाहनांविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.