अवजड माल वाहतुकीसाठी १६ वर्षीय चालकाचा वापर; बेकायदेशीर दगड खाणींसाठी दूरशेत ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ

पेण तालुक्यातील सांकशी किल्ल्याच्या परिसरात पेण तहसीलदार, वनविभाग आणि परिवहन विभागाच्या मूक संमतीने अनेक बेकायदेशीर दगड खाणी आणि क्रशर प्लांट सुरू आहेत. या खाणींमधून दररोज मोठ्या प्रमाणात खडीची मालवाहतूक अवजड डम्पर वाहनांद्वारे केली जाते.
अवजड माल वाहतुकीसाठी १६ वर्षीय चालकाचा वापर; बेकायदेशीर दगड खाणींसाठी दूरशेत ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ
Published on

अरविंद गुरव/पेण

पेण तालुक्यातील सांकशी किल्ल्याच्या परिसरात पेण तहसीलदार, वनविभाग आणि परिवहन विभागाच्या मूक संमतीने अनेक बेकायदेशीर दगड खाणी आणि क्रशर प्लांट सुरू आहेत. या खाणींमधून दररोज मोठ्या प्रमाणात खडीची मालवाहतूक अवजड डम्पर वाहनांद्वारे केली जाते.

मात्र, या गंभीर प्रकाराकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, दगडमाफियांना अभय दिले जात असल्याचा आरोप दूरशेत ग्रामस्थांनी केला आहे. शनिवारी दूरशेत गावात या मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांपैकी एका डम्परचा वाहनचालक केवळ १६ वर्षांचा अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर ग्रामस्थांचा संताप उफाळून आला.

खडीने भरलेला डम्पर भरधाव वेगाने जात असताना गावातील युवकांनी तो थांबवला. तपासणीअंती वाहन चालवणारा विजेंद्र कुमार साकेत हा फक्त १६ वर्षांचा असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे आधीच संतप्त असलेल्या दूरशेत ग्रामस्थांनी रस्त्यावरच आंदोलन छेडले. त्यानंतर पेणचे आमदार रवींद्र पाटील यांचे पुत्र वैकुंठ पाटील यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून, दूरशेत रस्ता मी स्वतःच्या खर्चाने बांधला आहे, त्यामुळे वाहने अडवू नयेत, असा बडेजाव केला.

जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच

या प्रकरणातील डम्परचे मालक 'सावनी इन्फ्रा' असून, ग्रामस्थांनी वाहन मालक व अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचून ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत ते पेण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू ठेवतील, असा स्पष्ट इशारा दिला.

logo
marathi.freepressjournal.in