बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीला चाप; २० दिवसांत ८ हजार ८३९ वाहनांवर कारवाई, १ कोटी ६५ लाखांचा दंड वसूल

राज्यातील एसटी बसस्थानक परिसर अवैध वाहतूक मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली.
बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीला चाप; २० दिवसांत ८ हजार ८३९ वाहनांवर कारवाई, १ कोटी ६५ लाखांचा दंड वसूल
बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीला चाप; २० दिवसांत ८ हजार ८३९ वाहनांवर कारवाई, १ कोटी ६५ लाखांचा दंड वसूलप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : राज्यातील एसटी बसस्थानक परिसर अवैध वाहतूक मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली.

१ ते २० जुलै या अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान राज्यभरात एकूण ८ हजार ८३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विविध यंत्रणांच्या संयुक्त कारवाईतून १ कोटी ६५ लाख २१ हजार ३१५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणारी १९५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

एसटी बसस्थानके ही दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहेत. मात्र, बसस्थानक परिसरात होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे वाहतूककोंडी, अनिर्बंध वाहतूकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षितते बरोबरच मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर होती. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संयुक्त कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले होते.

या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण होण्यास मदत झाली असून प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध होत आहे. अवैध पार्किंगला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अशा संयुक्त मोहिमा यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने राबविण्यात येणार आहेत. बसस्थानक परिसरातील वाहतुकीची शिस्त आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपली वाहने केवळ अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत आणि या जनहिताच्या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन एसटी महामंडळाने सर्व वाहनधारकांना केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in