

पुणे : हवामान निरीक्षण क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकत भारतीय हवामान विभागाने पुणे वेधशाळेत पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ‘डिजिटल सरफेस मेट्रोलॉजिकल ऑब्झर्व्हेशन सिस्टम’ विकसित केली आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे हवामान अंदाजाच्या वेग आणि अचूकतेत मोठी सुधारणा होणार असून, रिअल-टाइम डेटा उपलब्ध होणार आहे.
जागतिक हवामान दिनानिमित्त भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या हस्ते या प्रणालीचे आभासी उद्घाटन करण्यात आले. पुण्यातील ‘वेदर रिसर्च अँड सर्व्हिसेस’ विभागाने ही यंत्रणा विकसित केली आहे.
पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत ही डिजिटल प्रणाली दर मिनिटाला हवामानाची नोंद घेऊ शकते. त्यामुळे वातावरणातील बदलांचे सतत आणि सूक्ष्म निरीक्षण शक्य होणार आहे. या यंत्रणेत प्रगत सेन्सर्स आणि वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग व दिशा तसेच पावसाचे प्रमाण यांची माहिती तत्काळ मिळणार आहे.
या प्रणालीत जिओ-टॅगिंगची सुविधाही देण्यात आली असून, स्थानिक पातळीवरील हवामानाचे अचूक विश्लेषण करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे सूक्ष्म स्तरावर अधिक विश्वासार्ह अंदाज वर्तवता येतील.
पुण्यातील यशस्वी प्रयोगानंतर ही प्रणाली पुढील दोन ते तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने देशभर लागू करण्याची योजना भारतीय हवामान विभागाने आखली आहे. यामुळे देशभर उच्च-वारंवारतेचे डिजिटल हवामान निरीक्षण नेटवर्क तयार होऊन हवामान खात्याच्या कार्यक्षमतेत मोठी भर पडेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या वेधशाळांमध्ये दर तीन तासांनी मॅन्युअल नोंदी घेतल्या जातात, तर स्वयंचलित हवामान केंद्रांकडून दर १५ मिनिटांनी माहिती मिळते. मात्र, नवीन प्रणालीमुळे सातत्याने आणि अधिक सविस्तर माहिती संकलित होणार असल्याने हवामान अंदाज अधिक वेगाने आणि अचूकपणे वर्तवता येईल.
एस. डी. सानप, शास्त्रज्ञ आयएमडी