
नवी दिल्ली : जुलै महिना संपत आला तरीही राज्यात पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळाले नाही. थोडा वेळ धुव्वाधार बॅटिंग केल्यानंतर पावसाची उघडीप पाहायला मिळत असल्याने नेमका पाऊस कधी पडणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांना पडला आहे. त्यातच आता १५ ऑगस्टपर्यंत पावसाची विश्रांती असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस पाऊस सुट्टीवर जाणार असल्याने शेतपेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चिंता वाटू लागली आहे.
वाऱ्याची दिशा, गती आणि समुद्रातील हवामान बदलामुळे आता थेट १५ ऑगस्टनंतरच धुव्वाधार पावसाचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्यानंतर पावसाचे रौद्ररूप पुन्हा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पुढील तीन-चार दिवस तुरळक सरींसह ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा तसेच साताऱ्याच्या घाटमाथ्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल. मात्र त्यानंतर वरुणराजा सुट्टीवर जाणार आहे. हवामान बदलामुळे वरुणधारा बरसण्याची फारशी शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
तीन दिवस कोकण, विदर्भात दमदार पाऊस
पुढील तीन दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर भागात पावसाची उघडीप राहणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, भारतात सामान्यापेक्षा ८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. १ जुलै ते २८ जुलैदरम्यान देशात साधारण ४४०.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.