

पुणे : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पंजाब, हरयाणा राजस्थान या राज्यांमध्ये सध्या पश्चिमी चक्रावात आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून जी पावसाला पोषक वातावरण तयार करणारी आहे. त्यातच राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानात मोठे बदल दिसून येत आहेत. एकीकडे दिवसभर उष्णतेचा पारा वाढला आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा कायम आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आलेत.
सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांना अलर्ट
सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. जालना संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, भंडारा या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची हजेरी असणार आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज हलका पाऊस!
सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा १७ मार्च रोजी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, उर्वरित मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’. तर उर्वरित ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता
नंदुरबार, धुळे, नाशिक, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट. तर उर्वरित बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मंगळवारपासून १९ मार्चदरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात १ ते २ अं.से.ने हळूहळू वाढ होऊन त्यानंतर घट होण्याची, तर पुढील पाच दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पंजाब, हरयाणा, राजस्थान या राज्यांमध्ये सध्या पश्चिमी चक्रावात आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती पावसाला पोषक वातावरण तयार करणारी आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हिमालयाच्या जवळ असणारे राज्य ज्यात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरयाणा, राजस्थान या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे आणि गारा पडण्याचाही इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.