
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही. तीन वर्षांहून अधिक काळ एकाच मुख्यालयात सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.
अधिवेशनानंतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा योग्य तो न्याय देण्यात येईल, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले आहे. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर सर्व सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एसटी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, या मागणीला दुजोरा देत मंत्री सरनाईक यांनी याबाबतचा आढावा घेऊन एसटी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देता येईल, असा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
संगमनेर बसबाबत चर्चा
संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्या संदर्भात आमदार सत्यजीत तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारीत जागा देणे, नाशिक- पुणे महामार्गावरून जाणाऱ्या बस संगमनेर बस स्थानकांमध्ये थांबवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.