छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरा येथे ‘एमआयएम’चे कार्यकर्ते आणि पक्षातील नाराज गटाचे कार्यकर्ते यांच्यात मोठा राडा झाला. कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि नाराज कार्यकर्त्यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला चढवला, तर काहींनी त्यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण तापले आहे.
दोन गटांमध्ये हमरीतुमरी
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची बुधवारी संभाजीनगमध्ये पदयात्रा होती. या पदयात्रेला सुरूवातीपासून विरोध होत होता आणि नेमका त्यांच्यासमोरच हा राडा झाला. त्यांना नाराज कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांची थार गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी दोन गटांमध्ये हमरीतुमरी होऊन हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून सौम्य लाठीचार्ज केला. तर पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप नागरिकांनी इम्तियाज जलील यांच्यावर केला आहे.
जलीलांचे काँग्रेस उमेदवारावर आरोप
कलीम कुरेशी नावाचे एक उमेदवार काँग्रेसकडून उभे आहेत, त्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. एमआयएमने संभाजीनगरमध्ये २२ नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्यांना संधी दिली आहे. त्यावेळी, देखील असंतोष पसरला होता. त्याचे पडसाद बायजीपुरा येथे पाहायला मिळाले. आज घडलेल्या राड्यात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. कलीम कुरेशी हे प्रभाग ९ मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, तर प्रभाग १४ मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत.
कुरेशी दोन पक्षांतून दोन ठिकाणी लढताहेत
कलीम कुरेशी हे छत्रपती संभाजीनगरमधील माजी नगरसेवक असून मोठ्या प्रमाणात असलेल्या खाटीक समाजाचे ते नेतृत्व करतात अशी माहिती आहे. याआधी ते एमआयएममध्ये होते. पण इम्तियाज जलील यांच्यासोबत वाद झाल्यानंतर कलीम कुरेशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुरेशी सध्या एकाचवेळी दोन पक्षांतून दोन ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. तर प्रभाग क्रमांक १४ मध्ये ते काँग्रेसकडून लढत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील अवैध दारूच्या व्यवसायामध्ये त्यांचा हात असल्याचा आरोप केला जातो.