६ महिन्यांत ५६ हजार प्रवाशांनी केला व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास 

मध्य रेल्वेने आपल्या मार्गावर सुरु केलेल्या विस्टाडोम म्हणजेच मोठ्या काचेच्या खिडक्यांसह धावणाऱ्या विशेष डब्यांना आजतागायत चांगला प्रतिसाद
६ महिन्यांत ५६ हजार प्रवाशांनी केला व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास 

पावसाळ्याच्या दिवसात व्हिस्टाडोम कोचला उदंड प्रतिसाद मिळाला. डोंगर-घाटातून, नदी पुलावरून जाणारी रेल्वे आणि त्यातील व्हिस्टाडोम डब्यातून मिळणारा प्रत्यक्ष अनुभव यामुळे प्रवाशांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेने आपल्या मार्गावर सुरु केलेल्या विस्टाडोम म्हणजेच मोठ्या काचेच्या खिडक्यांसह धावणाऱ्या विशेष डब्यांना आजतागायत चांगला प्रतिसाद मिळत असून एप्रिल ते सप्टेंबर या ६ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५६ हजार ८९५ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. याद्वारे मध्य रेल्वेने ७.३२ कोटी एवढा महसूल मिळवला आहे.   

एप्रिल महिन्यापासून मध्य रेल्वेवर धावणाऱ्या काही गाड्यांमध्ये व्हिस्टाडोम कोचची जोड देण्यात आली आहे. वरून काचेचे छप्पर आणि रुंद खिडक्यांसह हे डबे प्रवाशांना विशेष आनंद देत आहेत. मुंबई - पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची विलोभनीय दृश्ये प्रवाशांना प्रत्यक्ष अनुभवता येत आहेत. मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये २०१८ मध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा जोडण्यात आला होता. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे २६ जून २०२१ पासून मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे मुंबई - पुणे मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला आहे. येत्या २५ जुलैपासून मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्सप्रेसला देखील विस्टाडोम लावण्यात आले आहे. तसेच पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये देखील एक विस्टाडोम कोच १० ऑगस्टपासून जोडण्यात आला आहे. हा बदल प्रवाशांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या विशेष विस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स यांसारखी अनेक असामान्य वैशिष्ट्ये आहेत. यासोबत दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट आणि गॅलरी सुद्धा यात आहे. प्रवास करत असताना निसर्गाचा सुंदर अनुभव आणि त्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी प्रवाशांना विस्टाडोम कोचमुळे मिळाली असून याच वेगळेपणामुळे या सेवेला उदंड प्रतिसाद मागील काही महिन्यांपासून मिळत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in