अमरावतीत चार खेळाडूंवर काळाचा घाला; १० जण जखमी

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला.
अमरावतीत चार खेळाडूंवर काळाचा घाला; १० जण जखमी

अमरावती : अमरावती-यवतमाळ मार्गावर नांदगाव-खंडेश्वरलगत शिंगणापूर येथे एका ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलला दिलेल्या जोरदार धडकेत ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीहरी राऊत, आयुष बहाळे, सुयश अंबरते, संदेश पाडर अशी मृतांची नावे आहेत. अमरावती शहरातील हे १५ तरुण यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हल्समधून निघाले होते. त्याचवेळी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वरपासून काही अंतरावर असणाऱ्या शिंगणापूर फाट्यालगत भरधाव वेगात असणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिली. या भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार झाले, तर अन्य १० जण गंभीर जखमी झाले. अपघात होताच शिंगणापूर येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि मदतकार्य राबवले. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी पोहोचत, जखमी झालेल्या तरुणांना नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, जखमी तरुणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना अमरावती शहरात उपचारासाठी हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, सर्व जखमींना तत्काळ अमरावती शहरातील रिम्स रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, या गंभीर घटनेचा तपास केला जात असल्याची माहिती नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोळंके यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in