आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी ; रॅपर राज मुंगासेवर गुन्हा

राज मुंगासे यांचा व्हिडिओ वादग्रस्त असून त्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते.
आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी ; रॅपर राज मुंगासेवर गुन्हा

व्हिडिओमधून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबद्दल अपशब्द आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर येथील रॅपर राज मुंगासे याच्याविरुद्ध अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पदाधिकारी स्नेहल कांबळे यांनी मंगळवारी रॅपर राज मुंगासे याच्याविरोधात अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. राज मुंगासे यांचा व्हिडिओ वादग्रस्त असून त्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यातील टिप्पणीवर आक्षेप नोंदवत गुन्हा दाखल करण्याची मागणी स्नेहल कांबळे यांनी तक्रारीत केली होती.

ठाणे पोलिसांनी राज मुंगासे याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०१ (अपमानकारक सामग्रीचा प्रसार करणं), ५०४ (सार्वजनिक शांतता बिघडवण्यासाठी हेतूपुरस्सर चिथावणी देणं) आणि ५०५(२) (शत्रुत्वाला प्रोत्साहन देणं) अंतर्गत अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सायबर क्राईम युनिटची मदत घेतली जात आहे, असे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले. चौकशीसाठी राज मुंगासे याला संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राजचा हा व्हिडिओच ट्वीट करत त्याच्याविरोधातील पोलीस कारवाईचा निषेध केला आहे.'आम्ही सगळे राज मुंगासे याच्या पाठिशी आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जाऊ शकत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in