भविष्यात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

केंद्रातील भाजप सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने देशातील विरोधी पक्षांना फोडण्याचे काम मोदी-शहा करत आहेत.
भविष्यात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने देशातील विरोधी पक्षांना फोडण्याचे काम मोदी-शहा करत आहेत. माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे व ते भाजपच्या संपर्कात असल्याचे ऐकण्यात आले आहे. त्यामुळे कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप पक्ष आज काँग्रेसव्याप्त झाला आहे. तसेच भविष्यात भाजपचा अध्यक्षदेखील काँग्रेसमधून आलेलाच असेल, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील पंचायत समिती मैदानावर सोमवारी आयोजित जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले की, “निवडणूक आयोगाने शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चोरांच्या हातात दिला. आता अशोक चव्हाणांच्या निमित्ताने काँग्रेसपण देणार का?” असा जाहीर सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला.

“देशात सगळीकडे एकाधिकारशाही दिसून येत असून १० वर्षांत भाजप सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती केली नाही. भाववाढ, महागाईने जनता त्रस्त आहे, मात्र केंद्रातले सरकार स्वार्थीवृत्तीने विरोधी पक्षांना फोडण्यात गुंग आहे. भाजपने मतांचा बाजार लावला असून विरोधी पक्षाच्या फोडाफोडीने स्व:पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय होत आहे, हेदेखील भाजप विसरत आहे. तसेच या निर्दयी सरकारला देशातील शेतकरी व त्यांच्या आत्महत्यांकडे पाहायला वेळ नाही. शेतीमालाचे भाव सातत्याने घसरत असून बळीराजा कर्जबाजारी होत आहे. मोदी सरकारमध्ये हिंमत असेल तर संपूर्ण देशात निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करावी,” असे आव्हान ठाकरे यांनी केंद्रातील सरकारला केले.

logo
marathi.freepressjournal.in