
इंदूरच्या स्वर्णबाग कॉलनीतील मल्टीमध्ये शनिवारी आग लागून सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती; मात्र हे अग्नीकांड नसून हत्याकांड असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. प्रेमिकेच्या खर्चिक स्वभावातून हे हत्याकांड घडल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी संजय ऊर्फ शुभम दीक्षित याला अटक केली आहे. शुभमने आपला गुन्हा कबूल केला आहे.
त्याने सांगितले की, तो मल्टी येथे राहणाऱ्या सना या तरुणीवर प्रेम करत होता; मात्र तिच्या वागणुकीमुळे मी त्रासलो होतो. तिने माझ्याकडून खूप पैसे उकळले. तिला खूप वेळा पैसे दिले. परत मागितले नाही. ती मला फसवत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी अनेकांशी संपर्क साधला. ती माझ्या मागेच लागली होती. मी केवळ तिच्या गाडीची सीट जाळणार होतो. मात्र, ही मोठी घटना घडेल, असे मला वाटले नव्हते.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीचा मोबाईल रात्री ९ वाजता सुरू होता. लोकेशन ट्रॅक करून आरोपीला अटक केली. सफेद शर्ट घातलेल्या तरुणाने गाड्यांना आग लावली आहे, असे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आले. त्याने पार्किंगमधील एका वाहनातून पेट्रोल काढले व आग लावली. त्यानंतर तो इमारतीत आला. तो सीसीटीव्ही व वीजेच्या मीटरसोबत छेडछाड करताना आढळला. पोलिसांनी तीन घरांचे सीसीटीव्ही फुटेज व डीव्हीआर जप्त केले आहेत.