जळगावचा पारा ४२ अंशावर : पाणीटंचाईचे संकट; ४२ गावांना ५० टँकरने पाणीपुरवठा

अमळनेर, चाळीसगाव, पारोळा, भडगाव, वरणगाव, चोपडा, बोदवड, पालिकांचा पाणीपुरवठा हा सहा ते आठ दिवसांनी होत आहे. अद्यापि एप्रिल आणि मे हे दोन महिने वाढत्या तापमानाचे असून पाणीटंचाईची स्थिती आणखीच बिकट होणार आहे.
जळगावचा पारा ४२ अंशावर : पाणीटंचाईचे संकट; ४२ गावांना ५० टँकरने पाणीपुरवठा

विजय पाठक/ जळगाव : जळगाव जिल्हयाचा कमाल पारा ४२ अंशावर गेला असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. जिल्ह्यात दरवर्षी होणारे उष्माघाताचे मृत्यू पाहता प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तसेच जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट आले असून जिल्ह्यात ४२ गावात ५० टँकरने पाणी पुरवठा होत आहे. प्रशासन निवडणूक प्रक्रियेत अडकले असताना पाणीटंचाईकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

१९६५ मध्ये बांधून पूर्ण झालेले उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण गिरणा धरण आतापर्यंत केवळ १२ वेळा पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. आज त्यात केवळ ३१ टक्के पाणीसाठा आहे. या धरणावर सात तालुके पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असून १० नगरपालिका, १३० पाणी पुरवठयाच्या योजना, १७४ गावे,मालेगाव, पाचोरा भडगाव नांदगाव एमआयडीसी पाण्यासाठी अवलंबून आहेत.

सध्या असलेला साठा जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे.यातून केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे. जिल्हयात तेरा मध्यम प्रकल्प असून यापैकी मन्याड, भोकरबारी प्रकल्पात पाणी साठा संपलेला आहे तर अग्नावती ६ टक्के, हिवरा, अंजनी प्रत्येकी १४ टक्के, बोरी २४ टक्के, बहुळा ३४ टक्के अशी पाणीसाठयाची स्थिती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ९६ लघु प्रकल्पात केवळ १६ टक्के साठा शिल्लक आहे.

अमळनेर, चाळीसगाव, पारोळा, भडगाव, वरणगाव, चोपडा, बोदवड, पालिकांचा पाणीपुरवठा हा सहा ते आठ दिवसांनी होत आहे. अद्यापि एप्रिल आणि मे हे दोन महिने वाढत्या तापमानाचे असून पाणीटंचाईची स्थिती आणखीच बिकट होणार आहे. अशावेळी पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनाला असेल. जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत असून चाळीसाव अमळनेरसह सहा तालुक्यांना विशेष झळ बसली आहे. ४२ गावात ५० टँकरनी पाणीपुरवठा होत असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठ्यासाठी टँकर लागण्यार असल्याचे दिसत आहे.

आज प्रशासन निवडणुक प्रक्रियेत अडकलेले असले तरी पाणीटंचाईकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा जनतेतून होत आहे. जळगावचा तापमानाचा पारा सध्या ४० अंशावर गेला असून जिल्हा वाढत्या तापमानाने होरपळायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी मेपर्यंत तापमान हे ४५ ते ४६ अंशापर्यंत पोहचते. तापमान ४० अंशावर जाताच जळगाव शहरातील जिल्हा रूग्णालय तसेच जिल्हयातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक आरोग्य केंद्रात तसेच जिल्हा रूग्णालयात सहा बेड राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.नागरिकांना उष्माघाताची लक्षणे आणि करावयाचे उपचार माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आले असून त्यांनी गरज नसल्यास दुपारी उन्हात जाण्याचे टाळावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in