फडणवीसांनी टाकला डाव; अभिजित पाटलांची साथ, माढ्यात चक्रे फिरविली

माढा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या टप्प्यात असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माढ्यात चतुराईने खेळी करीत मतदारसंघात उलथापालथ करून टाकली.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

विशेष प्रतिनिधी/ मुंबई

माढा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या टप्प्यात असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माढ्यात चतुराईने खेळी करीत मतदारसंघात उलथापालथ करून टाकली. त्यामुळे भाजप नेते हतबल झाले होते. परंतु अखेरच्या क्षणी फडणवीस यांनी खमक्या डाव टाकला आणि थेट शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिजित पाटील यांना आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळविले आणि अखेरच्या दिवशी थेट त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरच सांगता सभा घेऊन पंढरपूर भागात एक मोठा गट भाजपच्या बाजूने खेचला. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपसोबत असलेल्या मोहिते पाटील कुटुंबीयांनी अखेरच्या क्षणी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले होते. केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करून मोहिते पाटील शरद पवार यांच्यासोबत आले. तत्पूर्वी या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी होती. परंतु मोहिते पाटील बाहेर पडताच या भागातील वारे फिरले आणि त्यांच्यासमवेत करमाळ्याचे नारायण पाटील आणि माळशिरसचे उत्तम जानकर हेही राष्ट्रवादीसोबत आले. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांची ताकद वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या शक्तिस्थळाला छेद कसा द्यायचा, याचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडला होता. त्यांनी बरेच धक्के देऊन बघितले, परंतु कोणही धावून येत नव्हते. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना मोठा डाव टाकला आणि थेट राष्ट्रवादीतील शरद पवार यांचे निष्ठावान अभिजित पाटील यांना आपल्या बाजूने खेचले. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला.

अभिजित पाटील हे पंढरपूर तालुक्यातील एक मोठे प्रस्थ आहे. ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असून, ते या भागातील साखर सम्राट म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्यामागे मोठी शक्ती आहे. त्यांच्या कारखान्यावर ४५० कोटींचे कर्ज थकित आहे. त्यांच्याकडील कर्जवसुलीला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. या स्थगितीची मुदत संपताच राज्य सरकारने शिखर बँकेच्या माध्यमातून विठ्ठल कारखान्याच्या तीन गोडावूनला सील ठोकले. त्यामुळे शेतकऱ्यांचे पेमेंट कसे द्यायचे आणि आर्थिक कोंडी कशी फोडायची, याची चिंता अभिजित पाटील यांच्यासमोर होती. त्यामुळे त्यांनी लगेचच पारडे बदलत थेट फडणवीस यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी कारखान्याचे कारण पुढे करून त्यांना साथ देण्याचेही निश्चित केले.

त्यानुसार ते भाजपमध्ये दाखल झाले असून, अखेर आज त्यांनी थेट विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरच प्रचाराची सांगता सभा घेऊन आपण भाजपसोबत असल्याचे घोषित करून टाकले. एवढेच नव्हे, तर थेट फडणवीस यांना बोलावून त्यांनी आपली शक्ती दाखवून दिली. यावेळी फडणवीस यांनी अभिजित पाटील

यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. त्यामुळे आता

या मतदारसंघातील राजकीय गणित बिघडल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in