साताऱ्यात सव्वा कोटींची वीजचोरी उघडकीस, महावितरणकडून ३७४ ग्राहकांवर कारवाई करत १ कोटीचा दंड वसूल

सुमारे एक कोटीचा म्हणजेच तब्बल ९८ लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे.
साताऱ्यात सव्वा कोटींची वीजचोरी उघडकीस, महावितरणकडून ३७४ ग्राहकांवर कारवाई करत १ कोटीचा दंड वसूल

रामभाऊ जगताप/कराड

महाराष्ट्र वीज वितरण मंडळाने तथा महावितरणने गेल्या सन २०२३ या वर्षभरात जिल्ह्यामध्ये आकडा टाकून वीज चोरी करण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल ३७४ जणांनी बेकायदा वीज वापर करून वीज चोरी केल्याचे उघडकीस आले असल्याने त्याच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे एक कोटीचा म्हणजेच तब्बल ९८ लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे.

वीज वितरण कंपनी आपल्या वीज ग्राहकांना त्यांच्या वीज वापराचे बिल प्रत्येक महिन्याला ग्राहकाला देत असते. त्यानुसार ग्राहकही आपले बीज बिल भरत असतात; मात्र काही ग्राहक बिल वापर केल्याने त्याचे बीज देऊनही वीज बिल जमा करत नाहीत. इतकेच काय महावितरणचे कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही एखाद्याग्राहकाने विज बिल भरले नाही, तर महावितरणकडून त्या ग्राहकाचे वीज जोडणी तात्पुरती तोडली जाऊन वीज पुरवठा बंद केला जाते. तरीही पुढील तीन महिन्यांत वीज बिलाच्या थकबाकीचा भरणा केला नाही, तर वीज जोडणी कायम स्वरूपी तोडून वीज पुरवठा बंद केला जातो.

दरम्यान, महावितरण कंपनीने वीज जोडणी तोडल्यास अशा काही ग्राहकांकडून परस्पर बेकायदेशीरपणे वीजवाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी केली जाते. अशा आकडा टाकणाऱ्यांवर वीजवितरणने कारवाईचा बडगा उगारत विशेष भरारी पथकामार्फत संबंधित जागेवर छापा टाकत वीज चोरी उघडकीस आणली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आकडा टाकून वीज चोरणाऱ्या ३७४ जणांवर कारवाई करून सुमारे एक कोटीचा तब्बल ९८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे; मात्र, प्रत्यक्षात वीज गळती आणि वीज चोरीमुळे महावितरणला एक कोटी ३५ लाख रुपयांचा फटका बसला आहे. यामध्ये मीटर ट्रीप होणे किंवा डीपी जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड होणे अशा तांत्रिक कारणांमुळे वीज गळती होऊन महावितरण कंपनीला हा आर्थिक फटका बसल्याने कंपनीने विशेष भरारी पथकाची नियुक्ती करून वीज चोरी होणाऱ्या संभाव्य ठिकाणी धाडी टाकत भरारी पथकाने आकडा टाकणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवत कारवाईचा धडाका लावला होता. त्यामुळे ही वीज चोरी उघडकीस येऊन महावितरणला सुमारे ९८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात यश आले आहे, असा दावाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

महावितरणच्या विजेचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करणे, आकडा टाकणे अथवा मीटरमध्ये छेडछाड करणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. गेल्यावर्षी अशाप्रकारे उद्योग करणाऱ्या चार मोठ्या ग्राहकांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्याची कारवाई देखील केली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in