कराड येथे तंदूर भट्टीच्या उष्णतेने ३० वर्षे जुने झाड जळाले; कारवाईची नगरपालिकेकडे मागणी

हॉटेलची तंदूर रोटी तयार करण्याची भट्टी झाडाला लागूनच सुरू केल्यामुळे कराड येथील ३० वर्षांचे जुने झाड उष्णतेने पूर्णपणे...
(प्रातिनिधिक छायाचित्र)
(प्रातिनिधिक छायाचित्र)

कराड : हॉटेलची तंदूर रोटी तयार करण्याची भट्टी झाडाला लागूनच सुरू केल्यामुळे कराड येथील ३० वर्षांचे जुने झाड उष्णतेने पूर्णपणे वाळून वठले आहे. याबाबत येथील एन्व्हायरो नेचर फ्रेंड‌्स क्लब व वृक्षप्रेमींनी माहिती घेत संबंधित हॉटेल मालकाला याबाबत विचारणा केली आहे. सर्व नियम धाब्यावर बसवत हॉटेलची तंदूर रोटी तयार करण्याची भट्टी झाडाला लागूनच उभारल्याने त्याच्या उष्णतेने झाड वाळल्याने वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

'वृक्ष लावा व वृक्ष जगवा' या मोहिमेसाठी एन्व्हायरो नेचर फ्रेंड‌्स क्लब गेल्या अनेक वर्षापासून जनजागृती करत असताना, असा प्रकार समोर आल्यामुळे वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत येथील एन्व्हायरो नेचर फ्रेंड‌्स क्लब व वृक्षप्रेमींनी वृक्षाची हानी झाल्याबद्दल येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित हॉटेल मालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

येथील रेव्हेन्यू क्लबसमोरील व शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दत्त चौक ते तहसील कचेरी मार्गावरील एका बिर्याणी सेंटरमध्ये वृक्षाला लागूनच तंदुरी भट्टी सुरू केली असून, त्यामुळे भट्टीच्या तीव्र उष्णतेमुळे वृक्ष वाळल्याची माहिती एन्व्हायरो नेचर फ्रेंड‌्स क्लबला मिळाली.

त्यानुसार, एन्व्हायरो नेचर फ्रेंडस क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, नगरपालिकेचे नगरअभियंता ए.आर.पवार,प्रबोध पुरोहित, डॉ. सुधीर कुंभार, संतोष आंबवडे, प्रसाद पावसकर, श्यामसुंदर मुसळे, चंद्रशेखर नकाते यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत सदर झाडाची पाहणी केली. त्यावेळी वृक्षाशेजारीच हाँटेलची तंदूर भट्टी लावल्याचे दिसून आले. याबाबत संबंधित हॉटेलमध्ये चौकशी केली असता, त्यांनी तंदूर भट्टी वृक्षाजवळच लावली असल्याची चूक मान्य केली.

logo
marathi.freepressjournal.in