शिरूरमध्ये तिरंगी लढत : महायुतीचे शिवाजीराव आढळराव, महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि वंचितचे मंगलदास बांदल रिंगणात

शिरुरमध्ये महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. त्यातच आता मंगलदास बांदल यांनी या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने आता शिरुरचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे.
शिरूरमध्ये तिरंगी लढत : महायुतीचे शिवाजीराव आढळराव, महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि वंचितचे मंगलदास बांदल रिंगणात

पुणे : बारामती नंतर पवार कुटुंबाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मतदार संघ म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघ. या मतदार संघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांच्यात सरळ लढत होईल असे वाटत असतानाच काल उशिरा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरुर मतदार संघातून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता ही लढत तिरंगी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी उशिरा पुणे, शिरुर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड या ५ मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकसाठी शिरुरच्या जागेसाठी वंचितने जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे.

शिरुरमध्ये महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. त्यातच आता मंगलदास बांदल यांनी या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने आता शिरुरचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे. मंगलदास बांदल हे शिरुरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते, मात्र २०१९ला त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून उमेदवारी मिळेल त्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विडा उचलला होता.

मंगलदास बांदल यांनी मतदारसंघात चांगला जनसंपर्क ठेवला. तसेच उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस या बड्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या मात्र तरीही उमेदवारी मिळाली नाही. महायुती, महाविकास आघाडीत जागावाटपावरुन काही आलबेल सुरु होते. त्यामुळे मंगलदास बांदल यांनी वंचितसोबत संपर्क वाढवून उमेदवारी मिळवली. त्यामुळे आता शिरुरमध्ये मंगलदास बांदल, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे अशी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in