शरद पवारांची जोरदार मोर्चेबांधणी; अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन केली चर्चा

रासप नेते महादेव जानकर यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे माढ्यातून भाजपमधील बंडखोरी टळल्यास जानकर यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली जाऊ शकते.
शरद पवारांची जोरदार मोर्चेबांधणी; अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन केली चर्चा

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप काही अंशी रखडलेले असले तरी एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात विविध ठिकाणी सभा घेऊन शिवसेनेचे मतदारसंघ पिंजून काढत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार पुण्यातील आपल्या ‘मोदीबाग’ निवासस्थानी राजकीय नेते, इच्छुक आणि विविध मतदारसंघातील नेते, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्या-त्या भागातील निवडणूक रणनितीला आकार देत आहेत.

बुधवारी सकाळी रासप नेते महादेव जानकर यांची भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यानंतर याच मतदारसंघातील होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर वर्ध्यातून इच्छुक असलेले नितेश कराळे गुरुजी यांच्याशीही चर्चा केली. दरम्यान, बीडचे अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे तेही पक्षात प्रवेश करणार आहेत. तसेच ज्योती मेटेही पक्षात दाखल झाल्या आहेत.

माढ्याबाबत जानकरांशी चर्चा

या सर्व राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू पुण्यातील शरद पवार यांचे निवासस्थान मोदीबाग हे आहे. या ठिकाणी सकाळपासूनच राजकीय नेत्यांची वर्दळ पाहायला मिळत असून, राज्यातील विविध ठिकाणांहून नेते पवारांची भेट घेण्यासाठी येत आहेत. बुधवारी सकाळी रासप नेते महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे माढ्यातून भाजपमधील बंडखोरी टळल्यास जानकर यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली जाऊ शकते. त्याच रणनितीवर या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात खुद्द जानकर यांनी आमची चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले.

बजरंग सोनवणे शरद पवार गटात

मागच्या दोन लोकसभा निवडणुकांत राष्ट्रवादीतून निवडणूक लढविणारे बजरंग सोनवणे हे अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी मागच्या वेळी भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती. २०१९ मध्ये त्यांना ५ लाखांवर मते मिळाली होती. आताही ते इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे बोलले जाते.

बीडमध्ये पंकजांविरुद्ध ज्योती मेटे इच्छुक

बीड लोकसभा मतदारसंघही शरद पवार गटाच्या वाट्याला येणार आहे. तेथे भाजपने आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणाला मैदानात उतरवायचे, याबद्दलही शरद पवार यांनी रणनिती आखली आहे. त्यासाठी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे इच्छुक आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आता त्या थेट शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यामुळे एका महिलेच्या विरोधात महिला उमेदवार मैदानात उतरविण्याचे ठरविल्यास ज्योती मेटे मैदानात उतरू शकतात. विशेष म्हणजे बीडमध्ये वंजारी आणि मराठा समाजाचे प्राबल्य आहे.

logo
marathi.freepressjournal.in