Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी मतदान सुरू; पंतप्रधान मोदींचे मराठीतून ट्वीट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी मतदान सुरू; पंतप्रधान मोदींचे मराठीतून ट्वीट

मुंबई : देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्पा सुरू झाला आहे. देशातील २१ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशामधील १०२ जागांसाठी आज (१९ एप्रिल) मतदान सुरू झाले आहे. राज्यात पाच मतदारसंघात देखील मतदानाला सुरू झाली. यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या लोकसभा निवडणुकीत राज्याचे गणित पुर्णपणे बदलून गेले आहे. कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष हे महाराष्ट्राकडे लागले आहे. या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. मतदान केंद्रावर कोणताही गैरप्रकार घडून नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करणारा संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मी आवाहन करतो. शेवटी, प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो!"

राज्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान

राज्यातील पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे.

५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

  • रामटेक १६.१४ टक्के

  • नागपूर १७.५३ टक्के

  • भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के

  • गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के

  • आणि चंद्रपूर १८.९४' टक्के

logo
marathi.freepressjournal.in