काँग्रेसमध्ये खदखद वाढली; पटोले, थोरात यांच्यावर नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप

राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेना २२, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १० जागा असे सूत्र ठरल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसमध्ये खदखद वाढली; पटोले, थोरात यांच्यावर नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी/मुंबई 

एकीकडे महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरले असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ म्हणून पुढे आला आहे आणि काँग्रेसला केवळ १६ जागा मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने आणि काँग्रेसच्या बऱ्याच महत्त्वाच्या जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्याने काँग्रेस आमदार नाराज झाले आहेत. आता या नाराज आमदारांनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर नाराजी व्यक्त केली असून, या दोन्ही नेत्यांनी जागा वाटपात नरमाईची भूमिका घेतल्याचे म्हटले आहे. 

महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेऊन आपल्याकडे बऱ्याच जागा खेचून घेतल्या आहेत. सांगलीसारख्या ठिकाणी तर शिवसेनेची ताकद नसताना ही जागा शिवसेना ठाकरे गटाला दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यावरून काँग्रेसचे बरेच नेते नाराज झाले आहेत आणि त्यांनी थेट काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी याला थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना दोषी धरले असून, एकीकडे ठाकरे गट जागावाटपात आक्रमक भूमिका घेत असताना काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेण्याऐवजी नरमाईची भूमिका घेतल्याचे काँग्रेस आमदारांचे म्हणणे आहे. काँग्रेसला एकदम १६ जागा कशा काय मिळू शकतात, असा सवालही काँग्रेस आमदारांनी उपस्थित केला आहे. 

राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेना २२, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १० जागा असे सूत्र ठरल्याचे बोलले जात आहे. त्यावरून काँग्रेस आमदारांत नाराजी वाढली आहे. अद्याप हे सूत्र जाहीर झालेले नाही. मात्र, एकीकडे वंचितला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, वंचितशिवाय हे जागावाटप झाल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत काँग्रेस नेत्यांची खदखद बाहेर येत आहे. काँग्रेस आमदारांच्या सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकांमधून थेट सवाल उपस्थित केला जात असल्याचे समजते. जागा वाटपात नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक भूमिका घ्यावी, अशी काँग्रेस आमदारांची मागणी आहे. यावरून पक्षांतर्गत खदखद वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत नवा पेच निर्माण झाला आहे. यावर आता कसा तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात जागावाटपात आक्रमक भूमिका घेत नाहीत, त्यामुळे कॉंग्रेसच्या वाट्याला केवळ १६ जागाच येत आहेत. त्यामुळे एक तर जागावाटपाबाबत यांनी आक्रमक भूमिका घ्यावी आणि असे जागावाटप होणार असेल, तर आम्ही थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करू, असा इशारा या नाराज आमदारांनी दिला आहे. 

सांगलीच्या जागेवरून आता वाद चिघळणार?

सांगलीची जागा ही कॉंग्रेसची आहे आणि तेथे कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी जोरदार तयारीही केली होती. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात कॉंग्रेसची मोठी ताकद आहे. असे असताना शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे वाद चिघळला आहे. सांगलीच्या जागेवरून विरोधी पक्षांशी लढण्याऐवजी कॉंग्रेस आणि शिवसेनेतच वाद रंगण्याची चिन्हे आहेत. कारण कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा कॉंग्रेसला मिळालीच पाहिजे, अशी कॉंग्रेस नेत्यांनी भूमिका घेतली आहे. वेळ आली तर त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, अशी भूमिका आमदार विश्वजित कदम यांनी घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in