पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट ;अतिरेक्यांना सीरियामधून सूचना

जुलै महिन्यात पुण्यातील कोथरूड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आलम यांना अटक करण्यात आली होती
पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट ;अतिरेक्यांना सीरियामधून सूचना

पुणे : शहरात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी आखला होता. त्यासाठी दहशतवाद्यांना थेट सीरियामधून सूचना मिळत होत्या, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. आयसिसच्या महाराष्ट्र गटातील दहशतवाद्यांना सीरियातून याबाबतच्या सूचना मिळाल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.

एनआयएने सहा दिवसांपूर्वी कोंढव्यातून पसार झालेला दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम उर्फ शफिकूर रहमान आलम याला अटक केली. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले नसले तरी तो एनआयएच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला. दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सीरियामधून आदेश मिळत होते. साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून दहशत निर्माण करण्याचा कट त्यांनी आखला होता. पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध असल्याचे तपासातून समोर आले आहे.

एनआयएने आतापर्यंत मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान, कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी, जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन या सात दहशतवाद्यांविरुद्ध मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहेत. या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), स्फोटके तयार करणे, बाळगणे (एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स ॲक्ट), तसेच विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांचे ‘एनआयए’कडून कौतुक

जुलै महिन्यात पुण्यातील कोथरूड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आलम यांना अटक करण्यात आली होती. या दहशतवाद्यांकडून पुढे आयसिस मॉड्यूलचा खुलासा करण्यात एनआयएला यश आले. त्याबरोबरच पुणे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे महाराष्ट्रासह देशातील मोठे दहशतवादी कृत्य टाळण्यात यश आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने या कामगिरीबाबत पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in