बेरीज-वजाबाकीच्या राजकारणात वातावरण झाले अधिक गढूळ!

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री प्रथमच घडले तेही वजाबाकीच्या राजकारणातून. आता महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे सरकार आहे आणि याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत.
बेरीज-वजाबाकीच्या राजकारणात वातावरण झाले अधिक गढूळ!

- अरविंद भानुशाली

मतं आणि मतांतरे

महाराष्ट्रात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात बेरीज व वजाबाकीचे राजकारण सुरू झाल्याने वातावरण अधिक गढूळ होत आहे. शिवसेना फुटून ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मिळाले व उद्धव ठाकरे यांचे सरकार पडून भाजप-एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सत्ता प्राप्त केली. येथपर्यंत बेरजेचे राजकारण ठीक होते. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपविरोधी भूमिका घेऊन २४ पक्षांच्या आघाडीत शिवसेना सामील झाली होती. परंतु त्यानंतर भाजपने सुडाचे राजकारण करूनच शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली व अजित पवारांचा गट महायुतीत सामावून घेतला. आता तर चौथा भिडूही मनसेच्या रूपाने महायुतीत येऊ घातला आहे. त्यानंतर घडणाऱ्या घटना आरोप-प्रत्यारोपाची जुगलबंदी पाहता महाराष्ट्रात राजकीय वातावरण अधिक गढूळ झाले आहे. ‘सत्ताधारी व विरोधी पक्षातून आलेले आमचे’ ही भूमिका पुढे घातक होणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अशावेळी भाजप मोठा भाऊ या नात्याने सामंजस्य भूमिका घेणे अवश्य आहे.

यापूर्वी भाजप व शिवसेना ही युती हिंदुत्ववादावर अवलंबून होती. आता हिंदुत्व कुठे गेले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्याला हिंदुत्वाचा व बाळासाहेबांची शिवसेना असा मुलामा देण्यात आला. एकाच वेळी प्रारंभी १२-१३ व नंतर हळूहळू त्यांच्याबरोबरच्या आमदारांची संख्या ही ४० वर पोहोचली. हा सर्व उठाव होत असताना सुरत, गुवाहाटीपर्यंतची व्यवस्था, विमाने कुणी पुरविली, हे सर्व आमदार गुवाहाटीला नेण्याची आवश्यकता होती का? पुढे शिवसेना नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन बेरजेचे राजकारण करणे आवश्यक होते, परंतु ते न करता वजाबाकीचे राजकारण खा. संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे केले. तेथेच शिवसेना नेतृत्व फसले. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना ५२/५३ आमदारांपैकी ४० आमदार, १० अपक्ष आमदार (पाठिंबा देणारे) फुटून बाहेर जातात याची कल्पना येणे आवश्यक होते. परंतु उद्धवजींना बेरजेचे राजकारण करू न देण्याची भूमिका शरद पवारांनी संजय राऊत यांच्या प्रेरणेने घेतली, मग त्यातून ४० ‘रेडे’ गेले आहेत ही वजाबाकीची भाषा सुरू झाली. पुढील सर्व इतिहास महाराष्ट्राने बघितला आहे.

राज्यात प्रथम उद्धव ठाकरे यांचे सरकार पडून बंडखोर गटाचे सरकारच सत्तेवर आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे त्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री राहिले. हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का होता. ज्यांचे १०५ आमदार असताना ते उपमुख्यमंत्री का झाले हे पाहता त्यांना बेरजेबरोबर वजाबाकीचे राजकारण करायचे होते म्हणून.

एका बाजूला अभंग असलेली ८० टक्के शिवसेना फोडून भाजप सत्तेवर आला हे वजाबाकीचे व बदल्याचे राजकारण होते आणि म्हणूनच फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहिले. कारण त्यांना राष्ट्रवादी फोडायची होती आणि शेवटी तसेच झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री प्रथमच घडले तेही वजाबाकीच्या राजकारणातून. आता महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे सरकार आहे आणि याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत.

मनसेने हिंदुत्व पत्करले आहे. त्यामुळे तेही महायुतीत येऊ पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बहुधा त्यांना मुंबईतील एक जागा व राज्यातील एक जागा अशा दोन जागा देण्यात येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या जागावाटपाच्या नाटकामुळे महायुतीमध्ये बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण होत असल्याचे दिसते. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व काँग्रेसचे खजिनदार राहिलेले मिलिंद देवरा यांनी राज्यसभेच्या दोन जागा पटकावल्या आहेत. यामुळेच भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये व नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने हे बेरजेचे राजकारण असले तरी भाजप व शिवसेनेच्या दृष्टीने निष्ठावंत राहिलेल्या कार्यकर्त्यांना डावलून ही पदे देण्यात आली आहेत हे वजाबाकीचे राजकारण समजले जाते.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असताना भाजपने २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हे उमेदवार प्रचाराच्या कामाला लागले आहेत आणि अशावेळी राज ठाकरे हे महायुतीमध्ये सामील होत असल्याने या पक्षांतर्गत निवडीमध्ये वजाबाकी राजकारण सुरू झाले आहे. पाहू या पुढे काय काय होते ते?

हीच स्थिती महाविकास आघाडीतही झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व उबाठा (उद्धव ठाकरे) यांचे लोकसभा जागावाटप होते. आता त्यामध्ये २०१९ मध्ये 'गळ्यात अडकलेले हाडूक' म्हणजे बहुजन वंचित विकास आघाडी व भाजपबरोबर राहिलेला रासप हे महाविकास आघाडीकडे आल्याने जागावाटपात अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना ४ जागा देण्याचे उबाठाने जाहीर केले असताना त्यांना ७ जागा हव्यात, तर रासपलाही २ जागा हव्यात. या राजकारणात बेरजेचे राजकारण होता होता वजाबाकीचेच राजकारण सुरू झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in