लोकसभेत वाजणार महिलांचा डंका! राज्यात प्रमुख पक्षांकडून १४ महिला उमेदवार

१९५७ मध्ये देशाच्या संसदेत महिलांचा सहभाग केवळ ५.४ टक्के होता. २०१९ पर्यंत ते १४.४ टक्क्यांपर्यंत वाढला होता, आता संसदेत महिला आरक्षण कायदा मंजूर झाला असून ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे किमान १८१ महिला खासदार २०२४ च्या संसदेत असतील.
लोकसभेत वाजणार महिलांचा डंका! राज्यात प्रमुख पक्षांकडून १४ महिला उमेदवार

अरविंद गुरव / पेण

संसदेत महिला आरक्षण मंजूर झाले आहे. त्यामुळे महिलांसाठी संसदेचा रस्ता आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात येत्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी १४ लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांकडून १४ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्या पुरुष उमेदवारांना टक्कर देतील.

१९५७ मध्ये देशाच्या संसदेत महिलांचा सहभाग केवळ ५.४ टक्के होता. २०१९ पर्यंत ते १४.४ टक्क्यांपर्यंत वाढला होता, आता संसदेत महिला आरक्षण कायदा मंजूर झाला असून ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे किमान १८१ महिला खासदार २०२४ च्या संसदेत असतील.

महाराष्ट्रातील ४८ पैकी १४ लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांकडून १४ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. गेल्या लोकसभेत देशभरातून ७८ महिला निवडून आल्या होत्या. महिला खासदार संख्येचा तो उच्चांक समजला जातो. तर याच लोकसभेत महाराष्ट्रातूनही सर्वाधिक अशा आठ महिला खासदार निवडून गेल्या होत्या. यंदाच्या लोकसभेतही तो विक्रम मोडला जाईल, अशा लढती राज्यात होऊ घातलेल्या आहेत.

काही उमेदवारांची नावे अद्याप जाहीर व्हायची असून अजून बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आपल्या भावजय व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी लढणार आहेत. राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घराण्यातील या लढतीकडे सर्वाधिक लक्ष वेधले आहे. सुळे या अनुभवी आहेत. सलग तीन वेळा त्या लोकसभेत चांगल्या कामगिरीच्या जोरावर चमकत आहेत. सुनेत्रा पवार या राजकारणात नवख्या समजल्या जातात. मात्र अजित पवार यांच्या पत्नी, पवार घराण्याच्या सून व ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी म्हणून त्याही तगड्या उमेदवार मानल्या जातात.

रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून विद्यमान खासदार सुनिल तटकरे हे रिंगणात असून त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून (उबाठा) माजी खासदार अनंत गीते हे उभे आहेत. तटकरे विरुद्ध गीते ही प्रमुख लढत या मतदारसंघात होणार असली, तरी वंचित बहुजन आघाडीतर्फे कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी रान पेटवले आहे. त्यातच कुमुदिनी चव्हाण याही मराठा समाजाच्या असून रायगड जिल्ह्यात मराठा समाजाची मतांची टक्केवारी सुमारे ३० ते ३५ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण या रायगड-रत्नागिरी मतदारसंघात गेम चेंजर ठरू शकतात.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेकडून (शिंदे) राजश्री पाटील या उभ्या आहेत. पती हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांचे राजकारण, त्यांचे स्वतःचे संभाषणकौशल्य, गोदावरी अर्बन बँक, गोदावरी स्कूल, महिला बचत गट व इतर सामाजिक कार्याचा मोठा गट त्यांच्यामागे उभा आहे. त्यांचे माहेर यवतमाळ असून त्यांची लढत शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार संजय देशमुख यांच्याशी आहे.

दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार या दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावत आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादीच्या (शरद पवार) भास्कर भगरे यांच्याशी आहे. गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून जाऊनही त्यांचा मंत्रिपद मिळाले होते.

कल्याण मतदारसंघात शिवसेनेच्या (उबाठा) वैशाली दरेकर या उमेदवार आहेत. कल्याण डोबिंवली महापालिकेत त्यांनी शिवसेना व मनसेच्या तरुण नगरसेवक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.

नंदुरबार मतदारसंघातून डॉ. हिना गावित या तिसऱ्यांदा भाजपकडून आपले नशीब आजमावत आहेत. पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता त्यांना उमेदवारी मिळाली आहे.

धुळे मतदारसंघातून कॉँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव या निवडणूक रिंगणात आहेत. त्या विद्यमान खासदार भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्याशी दोन हात करतील. मात्र त्यांच्या उमेदवारीवरून कॉँग्रेसमध्येच नाराजीनाट्य रंगले आहे.

जळगाव मतदारसंघातून स्मिता वाघ या भाजपकडून लढत आहेत. त्यांचा सामना शिवसेनेच्या (उबाठा) करण पवार यांच्याशी होईल.

रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे या उमेदवार आहेत. त्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असून सलग तिसरी टर्म त्या जिंकतात का हे पाहणे महत्वाचे असेल.

अमरावती मतदारसंघातून भाजपच्या वतीने खासदार नवनीत राणा या रिंगणात आहेत. गेल्यावेळी त्या अपक्ष म्हणून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लोकसभेत पोहोचल्या होत्या. नंतर मात्र त्यांनी भाजपशी सलोखा राखत महाविकास आघाडी व विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा रोख केला होता. त्यांच्या बनावट जातप्रमाणपत्राचा मुद्दाही गेल्या टर्ममध्ये गाजला होता. यंदा मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरविल्याने त्या निवडणूक रिंगणात आहेत.

बीड मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्या राज्यात कॅबिनेट मंत्रीही होत्या. मधल्या काळात भाजप नेतृत्वाने दुर्लक्षित केल्याची भावना झाल्याने त्या नाराज आहेत, असा प्रचार प्रसारमाध्यमांत असायचा. त्या पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी त्यांचे राजकीय पुनर्वसन मानली जात आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर उभ्या असून त्यांची लढत भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांच्याशी आहे. त्यांचे पती दिवंगत सुरेश धानोरकर हे या मतदारसंघाचे खासदार होते. प्रतिभा धानोरकर या वरोरा-भद्रावतीच्या आमदार असून सामाजिक कार्यात त्या सतत अग्रेसर असतात.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असून त्या तब्बल तीन वेळा आमदार म्हणून सोलापूर मध्य मतदारसंघातून निवडून येत आहेत. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या त्या कन्या असून त्यांची राजकीय कारकीर्दही जाईजुई या सामाजिक संघटनेतून सुरू झाली आहे. त्या भाजपचे उमेदवार आ. राम सातपुते यांच्याशी लढत आहेत.

उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून (अजित पवार) अर्चना पाटील निवडणूक लढवत असून त्यांची लढत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी आहे. भाजपचे आमदार व माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या अर्चना या पत्नी असून माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in