कोल्हापूर-पुणे 'वंदे भारत'चा शुभारंभ, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

कोल्हापूर येथील छत्रपती शाहू टर्मिनल्स येथून सोमवारी सायंकाळी ४.२० वाजता 'वंदे भारत' पुण्याकडे रवाना झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.
कोल्हापूर-पुणे 'वंदे भारत'चा शुभारंभ, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
PTI
Published on

कोल्हापूर/कराड: कोल्हापूर येथील छत्रपती शाहू टर्मिनल्स येथून सोमवारी सायंकाळी ४.२० वाजता 'वंदे भारत' पुण्याकडे रवाना झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने यांच्यासह सत्यजित कदम, विजय जाधव, रूपाराणी निकम, राहुल चिकोडे, शिवनाथ बियानी व रेल्वेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी ४.२० वाजता कोल्हापुरातून निघालेली 'वंदे भारत' अवघ्या ३५ मिनिटांत म्हणजेच सायंकाळी ४.५५ वाजता मिरजेत पोहचली.

कोल्हापूर-मुंबई वंदे भारत ही रेल्वे देखील लवकरच सुरू होईल. त्यासाठी आपले विशेष प्रयत्न राहतील असे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री व्ही. सोमन्ना यांनी उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस सुरू करावी, तर खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूर-बंगळुरू ही देखील रेल्वे सुरू करावी, अशी मागणी व्ही. सोमन्ना यांच्याकडे केली. एकूण ५३० क्षमता असलेल्या या वंदे भारतमधून शाळेतील मुले, व्हीआयपी, राजकीय व्यक्ती, पत्रकार, सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी मिरज तसेच पुण्यापर्यंत प्रवास केला. दरम्यान या ट्रेनमुळे कोल्हापूर-पुणे प्रवास सोयीचा होणार आहे.

रेल्वे प्लॅटफॉर्मच्या दुतर्फा गर्दी

ढोल, ताशा आणि तुतारीच्या गजरात, प्रमुख मान्यवर यांच्यासह उपस्थितांनी "वंदे भारत"चे स्वागत केले. वंदे मातरम, वंदे भारतच्या गजरात प्रवाशांनी यावेळी जल्लोष केला. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या दुतर्फा झालेली गर्दी, मान्यवर यांच्या उपस्थितीत ही ट्रेन पुढे सरकली.

कराडमध्ये जोरदार स्वागत

कराड रेल्वे स्टेशनकावर आज सायंकाळी 'वंदे भारत'चे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांच्या हस्ते गाडीच्या लोकोपायलट यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गाडीला तिवारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी पुण्याकडे मार्गस्थ करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in