कास पठारावरील फुलांचा हंगाम होतोय सुरू; पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क किती? कोणत्या सोयीसुविधा मिळणार?

जागतिक वारसास्थळ अशी बिरुदावली लागली गेलेल्या 'कास पठारावर' उमलणाऱ्या फुलांच्या हंगामासाठी कास कार्यकारी पठार समिती सज्ज झाली असून कास फुलांच्या हंगामाचे येत्या गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी साताऱ्याचे खास.उदयनराजे भोसले व आम. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
कास पठारावरील फुलांचा हंगाम होतोय सुरू; पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क किती? कोणत्या सोयीसुविधा मिळणार?
Published on

कराड : जागतिक वारसास्थळ अशी बिरुदावली लागली गेलेल्या 'कास पठारावर' उमलणाऱ्या फुलांच्या हंगामासाठी कास कार्यकारी पठार समिती सज्ज झाली असून कास फुलांच्या हंगामाचे येत्या गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावर्षीच्या पर्यटन हंगामाच्या दृष्टीने कास समितीने पर्यटकांच्या विश्रांतीसाठी सहा नैसर्गिक झोपड्या, पार्किंग, शौचालय, मोफत बससेवा, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत.

सध्या कास पठारावर पावसाचे प्रमाण कमी झाले असून वेगवेगळ्या प्रकारची फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे. कास पठारावर पावसाच्या उघड-झापमुळे पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे कास पठार कार्यकारी समितीने तातडीने हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात १० सप्टेंबरनंतर कास पठाराचे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइनची सुविधा https://www.kas.ind.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क दीडशे रुपये, गाईड फी ४५ मिनिटाकरता शंभर रुपये, उपद्रव शुल्क दोन हजार रुपये, बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ४० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.

शालेय मुलांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवशी येणे बंधनकारक असणार आहे यासाठी महाविद्यालय प्राचार्यांचे पत्र सक्तीचे करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

यावर्षीच्या पर्यटन हंगामासाठी कास पठारावर १३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्किंग ते कास पुष्प पठार या दरम्यान पर्यटकांसाठी मोफत बससेवा दिली जाणार आहे. पुष्प पठारावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला आहे. समितीचे कार्यालय तसेच राजमार्ग यासह अन्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर सुद्धा सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे महिला,मुली यांना सुरक्षितपणे पर्यटनाचा मुक्तपणे आनंद घेता येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in