कोल्हापूर: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचालनालय व कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत कोल्हापुरातील श्री शाहू छत्रपती मिल येथे महासंस्कृती महोत्सव २०२४चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची सुवर्ण संधी असलेल्या या महोत्सवाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
शाहू मिल येथील महासंस्कृती महोत्सवात प्रदर्शनीय कलादालने, शिवकालीन छायाचित्र प्रदर्शन, ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन, स्थानिक हस्तकला प्रदर्शन व विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम यासह कोल्हापूरची खाद्य संस्कृती पहायला व प्रत्यक्ष अनुभवयास मिळणार आहे. आजपासून सुरू झालेला सांस्कृतिक महोत्सव ४ फेब्रुवारीपर्यंत मोफत सर्वांसाठी सुरू असणार आहे.
या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसिलदार स्वप्निल रावडे, सहाय्यक संचालक पुराभिलेख दिपाली पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, उदय पाटील, प्रमोद पाटील, ऋषीकेश केसकर यांच्यासह कलादालन उभारलेले सर्व स्थानिक स्टॉलधारक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, या महोत्सवाचा उद्देश आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणे व आपल्या पारंपरिक कला सर्वांच्या समोर आणणे हा आहे. आपली मराठी संस्कृती सादर करण्यासाठी स्थानिक तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून कलाकार येणार आहेत. आपले आवडते ठिकाण शाहू मिल येथे स्थानिक कलाकारांना व त्यांच्या कलागुणांना प्रशासनाने चांगले व्यासपीठ तयार करुन दिले आहे. अशा या आपल्या कलावैभवाचे दर्शन घेण्यासाठी सर्वांनी आपल्या कुटुंबासह यावे. बांबूपासून बनविलेल्या हस्तकला, बचत गटांनी तयार केलेले साहित्य यासह आपली कोल्हापूरी ओळख असलेल्या खाद्य संस्कृतीचा आस्वादही याठिकाणी घेता येणार आहे.
येथील रंगमंचावर स्थानिक कला, नृत्य यासह ऐतिहासिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. याचा लाभ राज्यातील सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रदर्शनीय कलादालनांना भेट देताना त्यांनी विविध हस्तकलांमधून आपला सांस्कृतिक वारसा प्रत्येक घरात आठवणीत राहील, अशा वस्तूंची निर्मिती व विक्री करण्याच्या सूचना केल्या.