महाविजयासाठी रवींद्र चव्हाणांचे आई भराडीला साकडे! आंगणेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृहाचे दिमाखात लोकार्पण

मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी पालक मंत्री यांचे आभार मानताना मागील सात वर्षे केवळ आश्वासन मिळालेली कामे पालक मंत्री यांनी पूर्ण केल्याचे सांगितले.
महाविजयासाठी रवींद्र चव्हाणांचे आई भराडीला साकडे! आंगणेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृहाचे दिमाखात लोकार्पण

मालवण : “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर जिल्ह्यात आमूलाग्र बदल झाला आहे. आमचा जिल्हा सर्वच बाबतीत बेस्ट आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यवस्थे बद्दल सकारात्मक विचार ठेवा. व्होकल फॉर लोकलचा प्रचार आपणच करायचा आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून मोठा बदल शक्य आहे. आगामी काळात लोकसभेच्या महाविजयासाठी आपण आज आई भराडीदेवीच्या चरणी साकडे घालत पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच व्हावेत”, असे साकडे घातल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे केले.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची स्वच्छतागृह अभावी गैरसोय होत असल्याने सुमारे २ कोटी निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचा लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, आंगणे कुटुंबीय अध्यक्ष भास्कर आंगणे, सीईओ प्रजित नायर, जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ कुमार अग्रवाल, सेवानिवृत्त उप मुख्य कार्य अधिकारी राजेंद्र पराडकर, सरपंच मानसी पालव, उपरपंच समीक्षा आंगणे, भाजप नेते राजन तेली, तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगले, बीडीओ आत्मज मोरे, पोनि प्रवीण कोल्हे, तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, बाबा परब, ठेकेदार संतोष कदम आदी उपस्थित होते.

पालक मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, "देशात आणि राज्यात हिंदुमय वातावरण निर्माण झाले आहे. संस्कृती जपण्यासाठी सरकारचे पाठबळ मिळत आहे. वेगवेगळे विकास प्रकल्प जिल्ह्यात येत आहेत. नेव्ही डे नंतर राजकोट किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत आहेत. यातून व्यापार सुद्धा वाढत आहे. सिंधुदुर्गमधील सर्व किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी भाजपची टीम काम करत आहे. भगवंतगड, रामगड, नांदोस या किल्ल्यावर जमीनमालकांनी जागा देण्याची संमती दिली आहे. बजेटमध्ये या किल्यांना आदर्श पद्धतीने संवर्धन करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. मोरयाचा धोंडा हे देवस्थान सुद्धा विकसित होत आहे."

मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी पालक मंत्री यांचे आभार मानताना मागील सात वर्षे केवळ आश्वासन मिळालेली कामे पालक मंत्री यांनी पूर्ण केल्याचे सांगितले. पालक मंत्री यांची भराडीदेवीवर असलेली श्रद्धा त्यांना येथील विकासकामांसाठी प्रेरणा देत आहे. यावेळी आंगणे कुटुंबीयांच्या वतीने पालक मंत्री रवींद्र चव्हाण व भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष सत्कार करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in