
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांना पूर आले आहेत. मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पावसाने तापी नदीला पूर आला आहे. तापी नदीवरील हातनूर धरणाचे सर्व २१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून चार लाख १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी हातनूर धरण आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या गावांना भेटी देत परिस्थितीची पाहणी केली. २१ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी वर्गात समाधान आहे. या पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात वाढ झालेली आहे. गिरणा धरणात ५४ टक्के तर जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणामध्ये ८४ टक्के साठा झाल्याने जळगावकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
गेल्या २४ तासापासून पडत असलेल्या पावसाने तापी नदीला पूर आलेला आहे. मध्य प्रदेशातून तापी नदी जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पावसाने तापी दुथडी भरून वाहत आहे. तापी नदीवरील हातनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून शनिवारी दुपारी त्यातून चार लाख १२ हजार क्युसेक एवढ्या प्रचंड पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर मध्यप्रदेशात पावसाने काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले. सायंकाळी धरणातून तीन लाख ३४ हजार एवढ्या पाण्याचा विसर्ग सुरू होता.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस प्रमुख राजकुमार यांनी हातनूर धरण व गावांना भेटी दिल्या. तापी नदीच्या बॅकवॉटरमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची प्रशासनाला पूर्ण कल्पना असून परिस्थितीबाबत प्रशासन पूर्ण दक्ष असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांना कार्यवाहीबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे तापीला मोठा पूर आलेला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. जिल्ह्यात अन्य तालुक्यातही प्रशासन पूर्णपणे दक्ष असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.