अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे

आयकर विभागाच्या निशाण्यावर आले असून त्यांच्याशी संबंधित चार कारखान्यांवर एकाच वेळी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.
 अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे

पंढरपूर येथील तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांच्यावर आयकर विभागाने गुरुवारी छापे मारले. अभिजीत पाटील यांनी गेल्या काही वर्षांत राज्यात चार खासगी कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यामुळेच अखेर पाटील हे आयकर विभागाच्या निशाण्यावर आले असून त्यांच्याशी संबंधित चार कारखान्यांवर एकाच वेळी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील २० वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन तो गेल्यावर्षी यशस्वीपणे चालवून दाखवला होता. त्यानंतर पंढरपुरातील एक बड्या कारखान्याची निवडणूक लढवून त्यामध्येही विजय मिळवल्याने ते पुन्हा चर्चेत आले होते. पाटील यांना राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा पाठिंबा असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे या धाडसत्रात आयकर विभागाच्या हाती काय लागले हे पाहावे लागेल.

अभिजित पाटील हे वाळू ठेकेदार होते. तुकाराम मुंडेंच्या काळात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळे त्यांना तीन महिने तुरुंगात राहावे लागले. बाहेर आल्यानंतर अभिजित पाटील यांनी मार्ग बदलला. आधी धाराशिव कारखाना, नंतर नांदेड, नाशिकलाही कारखाना चालवायला घेतला. २० वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेतला. ३५ दिवसांतच सांगोला कारखाना त्यांनी रुळावर आणला. यामुळेच गेल्या २ वर्षांपासून बंद असलेल्या विठ्ठल कारखान्यासाठी सभासदांनी त्यांना मागील महिन्यात पसंती दाखवली.

एक साखर कारखाना चालवणंही अनेक नेत्यांना जमत नसल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. अनेकदा शेतकऱ्यांची बिले तशीच अडकून राहतात. पण अभिजित पाटलांनी पाच वर्षांत पाच कारखाने चालवायला घेऊन शेतकऱ्यांनाही खूश केले होते. मात्र, आता आयकर विभागाने धाडी टाकल्याने पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अभिजीत पाटलांकडे असलेले साखर कारखाने

१) धाराशीव साखर कारखाना, चोरखडी (उस्मानाबाद)

२) धाराशीव साखर कारखाना युनिट २ (लोहा, नांदेड)

३) वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी, (चांदवड, नाशिक)

४) सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना (सांगोला, सोलापूर)

५) विठ्ठल सहकारी साखर कारखाना (पंढरपूर)

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in