ग्लोबल टीचर रणजीतसिंह यांच्या अडचणीत वाढ ; ३४ महिन्यांचा पगार झेडपी प्रशासन करणार वसूल

अमेरिका येथील फुलब्राईट या संस्थेकडून डिसले गुरुजी यांना सुमारे साडेसात कोटी रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली
ग्लोबल टीचर रणजीतसिंह यांच्या अडचणीत वाढ ; ३४ महिन्यांचा पगार झेडपी प्रशासन करणार वसूल

सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजीतसिंह डिसले गुरुजी यांचा पाय खोलात जाणार हे आता स्पष्ट झाले आहे .डिसले गुरुजी यांच्याकडून जिल्हा परिषद प्रशासन ३४ महिन्यांचे तब्बल १७ लाख रुपये वेतन वसूल करणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर अर्थात डाएटकडे प्रतिनियुक्तीवर असताना गैरहजर असल्याच्या प्रकरणात डिसले गुरुजी यांच्यावर ही कारवाई होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली.

काय आहे प्रकरण :

अमेरिका येथील फुलब्राईट या संस्थेकडून डिसले गुरुजी यांना सुमारे साडेसात कोटी रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे .त्यांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अमेरिका येथे जाण्यासाठी रजा आवश्यक असल्यामुळे त्यांनी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे रजा मागणी केली होती. यावरून शिक्षणाधिकारी आणि डिसले गुरुजी यांच्यात वाद रंगला होता. या प्रकरणी तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार त्यांना सहा महिन्यांची रजा मंजूर करण्यात आली होती.

दरम्यान रणजीतसिंह डिसले गुरुजी यांच्यावर ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी अर्ज करताना अधिकाऱ्यांची परवानगी न घेणे, जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे नियुक्ती असताना गैरहजर राहणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. या वादात डिसले गुरुजी सापडल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in