
भास्कर जामकर/नांदेड
नांदेड जिल्ह्यात कोरोना महामारीनंतर तब्बल १७७ आंतरजातीय जोडप्यांनी एकत्र येत सुखी संसाराच्या ‘रेशीम गाठी’ बांधल्या आहेत. २०२२ मध्ये ३०, २०२३ मध्ये ७९ आणि २०२४ मध्ये ६८ दाम्पत्यांनी विवाह केला आहे. समाजात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढत आहे.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना आहे. या जोडप्यांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. पाठवलेले प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून, मार्चअखेर अनुदान मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी अनुदानाची योजना सुरू करण्यात आली आहे. जातीय भेदाभेद नष्ट करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमाणात मान्यता मिळत असली तरी अद्यापही आंतरजातीय विवाहांचे प्रमाण तसे पाहता अत्यल्प आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाद्वारे विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात येतो. शासनाने मागील निधीच उपलब्ध करून दिला नव्हता. मार्चअखेर लाभार्थीच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रवर्गांना मिळतात सवलती
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन, शीख असल्यास आंतरजातीय विवाहितास अनुदान लागू करण्यात येते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमातीमधील आंतर प्रवर्गातील आंतरजातीय विवाहासाठीही सवलती लागू आहेत.