मुंबई: राज्यातील तासिका तत्त्वांवरील अध्यापकांना मानधनात वाढ करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली. शासकीय, अशासकीय महाविद्यालयांमधील अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालयातील अध्यापकांना याचा फायदा होणार आहे. त्यानुसार नवे सुधारित दर जाहीर करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने कला, वाणिज्य, विज्ञान पदवी शाखेतील अध्यापकांना प्रतितास ६२५ वरुन आता ९०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आता प्रति तास १ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. या अगोदर हे मानधन ७५० इतके होते.
राज्यातील शासकीय, अशासकीय महाविद्यालयांमधील अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालयातील मंजूर भरलेली पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणांमुळे रिक्त होणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून अध्यापनात खंड पडू नये म्हणून रिक्त पदांवर तासिक तत्त्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.