कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ! शिवसागर जलाशयात १५ हजार ६५० क्युसेक्स पाण्याची आवक

मंगळवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठ्यात १.३७ टीएमसीने वाढ झाली आहे तर नवजा व महाबळेश्वर येथील पावसाने हजारचा टप्पा पूर्ण केला आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ! शिवसागर जलाशयात १५ हजार ६५० क्युसेक्स पाण्याची आवक
प्रातिनिधिक फोटो

कराड : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटणसह कराड, सातारा, जावळी, महाबळेश्वर तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्यामुळे कोयनानगर येथे गेल्या चोवीस तासात १४६,नवजा १११ व महाबळेश्वर येथे १४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवकही वाढल्यामुळे सध्या शिवसागर जलाशयात १५ हजार ६५० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. मंगळवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठ्यात १.३७ टीएमसीने वाढ झाली आहे तर नवजा व महाबळेश्वर येथील पावसाने हजारचा टप्पा पूर्ण केला आहे.

संपूर्ण जून महिन्यात विस्कळीतपणे पाऊस पडला होता. मात्र जुलै महिना सुरू झाला आणि पहिल्याच दिवसापासून जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटणसह कराड, सातारा, जावळी, महाबळेश्वर तालुक्यात व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. मंगळवारी पाटणसह कोयना धरण परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. यामुळे परिसरातील ओढ्या, नाल्यांना पाणी वाढल्याने पाटण तालुक्यातील कोयना, केरा, मोरणा, काजळी, काफना, उत्तरमांड या नद्यांच्या तर कराड तालुक्यातील मुख्य असलेल्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाल्याने दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे मणदुरे विभागातील साखरी-चिटेघर धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने केरा व कोयना नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या पाऊस सुरूच असल्यामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या २१.९३ टीएमसी इतका पाणीसाठा

मंगळवारी कोयनानगर येथे १४६ (९८८), नवजा १११ (११८३), महाबळेश्वर १४३ (१००६) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयातील पाणीपातळी २०५९ फूट १०.०६ इंच म्हणजेच ६२७. ८३७ मीटर इतकी झाली आहे. सध्या शिवसागर जलाशयात १५ हजार ६५० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या धरणात सध्या २१.९३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. सध्याच्या जोरदार पावसामुळे नवजा व महाबळेश्वर येथील पावसाने हजारचा टप्पा पूर्ण केला आहे, तर पाटण शहरातही दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू असल्याने ओढे व नाले तुडुंब भरल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in