महायुतीत मिठाचा खडा! ठाण्यात भाजपला सापत्न वागणूक : आमदार संजय केळकर यांचा आरोप

‘मुँह मे मोदीजी का नाम...और थाना मे बीजेपी बेनाम’, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही केळकर यांनी दिली आहे.
महायुतीत मिठाचा खडा! ठाण्यात भाजपला सापत्न वागणूक : आमदार संजय केळकर यांचा आरोप
Published on

ठाणे : राज्यात एकीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार असताना आता मुख्यमंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. एकीकडे ठाणे लोकसभेवरून शिवसेना आणि भाजपमधील विस्तव जात नसताना आता शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यात भाजपला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

‘मुँह मे मोदीजी का नाम...और थाना मे बीजेपी बेनाम’, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही केळकर यांनी दिली आहे. महिलांना परिवहन सेवेत ५० टक्के सवलत देण्याची योजना आमची असताना आम्हालाच या कार्यक्रमातून डावलल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे.

ठाणे पालिकेच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून ६० वर्षांवरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत व बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याच्या लोकाभिमुख घोषणा करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत घोषणा केली होती. या योजनेचा शुभारंभ बुधवार, १३ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सॅटिस पूल येथे सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला.

या ठिकाणी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे व शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित नसल्याबाबत आमदार संजय केळकर यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.

भाजपला हे नवीन नाही, अखंड शिवसेनेसोबत २५ ते ३० वर्षे आम्ही एकत्र होतो, आत्ता विभक्त झालेल्या शिवसेनेसोबत आहोत, मात्र अशा पद्धतीच्या वागणुकीची भाजपला सवय झाल्याचे केळकर म्हणाले. एकतर्फी निर्णय, एकतर्फी धोरण, एकतर्फी कोणाला कार्यक्रमांना बोलवायचे नाही, असे ठाण्यात वारंवार घडते मी याबाबत बोलणार नव्हतो. मात्र सहनशक्तीला काही मर्यादा असते, अशा शब्दांत केळकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या एकछत्री कार्यपद्धतीवर परखड टीका गेली.

भाजपचा कार्यकर्ता स्वाभिमानी असून त्याला वेळोवेळी डावलले जात आहे, ‘मुँह मे मोदीजी का नाम...और थाना मे बीजेपी बेनाम’ अशा शब्दांत केळकर यांनी शिवसेना शिंदे गटाला लक्ष्य केले. भाजपचे कुठे नावही नको अशी सध्या स्थिती असून भाजपला हे पटणारे नाही, असे केळकर म्हणाले..

logo
marathi.freepressjournal.in