स्वतंत्र विदर्भाचा वाद पेटला ;आंदोलकांचा रास्ता रोको : अल्टिमेटमनंतर आक्रमक पवित्रा

नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवाद्यांनी रस्ता अडविल्याचे समजताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळा केला
स्वतंत्र विदर्भाचा वाद पेटला ;आंदोलकांचा रास्ता रोको : अल्टिमेटमनंतर आक्रमक पवित्रा

विशेष प्रतिनिधी/मुंबई :एकीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी बचावचा एल्गार सुरू असतानाच स्वतंत्र विदर्भाचा वादही उफाळला असून, वेगळ्या विदर्भासाठी लढा सुरू करण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारला ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली गेली होती. मात्र, त्याची दखलही घेतली नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भवादी आता आक्रमक झाले असून, त्यांनी सोमवारी नागपुरात थेट रस्ताच अडवून धरला. त्यामुळे संविधान चौकात वाहतूककोंडी झाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हजेरी लावत आंदोलकांवर कारवाई केली. मात्र, यापुढे स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा विदर्भवाद्यांनी दिला आहे.

स्वतंत्र विदर्भासाठी नागपुरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सुरुवातीला या मागणीने जोर धरला, त्यावेळी राज्य सरकार मध्यस्थी करून आंदोलकांची समजूत काढेल, असे वाटत होते. मात्र, राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यातच २७ डिसेंबरपासून नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणादरम्यान अनेक आंदोलकांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात न्यावे लागले. त्यातच आंदोलकांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ३१ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. तसेच त्यानंतर गनिमाकावा पद्धतीने आंदोलन केले जाईल, असाही इशारा दिला होता. मात्र, राज्य सरकारने यादरम्यान या आंदोलनाची फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांनी थेट संविधान चौकातच रस्ता अडविला.

केवळ नागपुरातच नव्हे, तर विदर्भात अनेक ठिकाणी स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच सोमवारी थेट संविधान चौकातच रस्ता अडविल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. त्यातच इतर ठिकाणीही आता आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच मराठा आरक्षण आणि ओबीसी एल्गारमुळे अडचणीत असलेल्या सरकारसमोर आणखी एक मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. विशेष म्हणजे विदर्भवाद्यांनी यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचे ठरविले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पुढेच नवनवे प्रश्न उपस्थित होत असल्याने निर्णय घेताना सरकारची चांगलीच कोंडी होणार आहे.

सरकारविरोधात घोषणाबाजी

नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवाद्यांनी रस्ता अडविल्याचे समजताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळा केला. परंतु तोपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हळूहळू ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र, यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आल्याने पोलिसांनाही खूप कसरत करावी लागणार आहे. तसेच या माध्यमातून सरकारलादेखील नव्या आव्हानाचा सामना करण्याची वेळ येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in