इंडिया आघाडी बनेल शेतकऱ्यांचा आवाज; नाशिकच्या मेळाव्यात राहुल गांधी यांचे आश्वासन

लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांची इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास ती शेतकऱ्यांचा आवाज असेल आणि शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी धोरणे तयार केली जातील. इतकेच नव्हे, तर...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देऊन गुरुवारी पूजा केली. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांना मोतीलाल नेहरू यांच्या हस्ताक्षरात असलेले संग्रहातील दस्तावेज दाखविले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देऊन गुरुवारी पूजा केली. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांना मोतीलाल नेहरू यांच्या हस्ताक्षरात असलेले संग्रहातील दस्तावेज दाखविले.

नाशिक : लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांची इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास ती शेतकऱ्यांचा आवाज असेल आणि शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी धोरणे तयार केली जातील. इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांची जीएसटीच्या कचाट्यातून मुक्तता करून पीक विमा योजनेची पुनर्रचना केली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत हेही हजर होते. राहुल गांधी यांची सध्या ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू असून ते सायंकाळी नाशिकमध्ये रोड शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी जातनिहाय जनगणनेच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

भाजपमुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, आज द्राक्ष, कांदा, कापूस या शेतमालाला भाव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत, अशी भूमिका घेतली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे. त्याला भाजपचे सरकार जबाबदार आहे. यूपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. सध्याच्या भाजप सरकारची शेतकऱ्यांबद्दल अनास्था असल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.

भाजप राज्यात कांद्याला नव्हे, गद्दारांना चांगला भाव - राऊत

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतकऱ्यांची, जनतेची बात ऐकत आहेत, पण काही लोक फक्त ‘मन की बात’च करतात. या यात्रेमुळे देश जोडण्याचे, लोकांना जोडण्याचे काम केले आहे. चांदवड ही कांदा नगरी आहे, पण या कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. भाजपच्या राज्यात गद्दार आमदार, खासदारांना ५०-५० कोटी रुपयांचा भाव मिळतो, पण कांद्याला भाव मिळत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी ‘जय जवान व जय किसान’चा नारा दिला होता, पण आज भाजपच्या राज्यात शेतकरी व जवान दोघेही मरत आहेत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत. या यात्रेने एक गॅरंटी तर पक्की केली आहे आणि ती म्हणजे ‘मोदी तो गयो’ असे म्हणत मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आली - पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाइलवर करेन, असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमीभाव देणार, अशी आश्वासने यवतमाळमध्ये दिली होती. पण गेल्या १० वर्षांत ती पूर्ण केली नाहीत, मोदींनी शेतकऱ्यांना फसवले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही, असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या. या शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजप सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन पटोले यांनी केले. या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात, जयराम रमेश यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व हजारो शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in