

देवश्री भुजबळ / मुंबई
भारताने पाकिस्तानला निश्चितच धडा शिकवला असे नमूद करतानाच 'ऑपरेशन सिंदूर'विषयी सर्व माहिती समोर येईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे; तेव्हाच आपल्याला संरक्षण दलाच्या यशाचे खरे चित्र समजू शकेल, असे ज्येष्ठ भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान पक्षाध्यक्षांची मुदत जूनपऱ्यंत असून नवा अध्यक्ष जूननंतर अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
`दै. नवशक्ति` व `दि फ्री प्रेस जर्नल`ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सहस्रबुद्धे यांनी, पाकिस्तानसोबत मध्यस्थीला वाव नसून आंतरराष्ट्रीय नेत्यांकडून होणाऱ्या प्रतिक्रियांना बळी पडू नये, असे आवाहन नागरिकांना केले.
भारत-पाकिस्तान लष्करी कारवायांबाबत पसरवलेल्या चुकीच्या माहितीबाबत राज्यसभेचे माजी खासदार सहस्रबुद्धे म्हणाले की, सोशल मीडियाच्या युगात - जिथे माहितीचा मारा सुरू असतो तिथे लोकांनी निर्णय घेणे व निष्कर्ष काढणे टाळावे. सत्यता राखण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस आणि भाजप सरकारांच्या पाकिस्तानविरोधातील लष्करी कारवायांच्या तुलनेबाबत त्यांनी सांगितले की, नव्या पिढीला आता निकाल देणाऱ्या कृती हव्या आहेत. मात्र १० मे रोजी घोषित झालेली युद्धविरामाच्या घोषणेची नेहरू सरकारच्या काळातील युद्धविरामाशी तुलना करता येणार नाही. शत्रूने आपल्या भूमीत घुसखोरी करावी आणि मग आपण युद्धविराम घोषित करावा, हे मान्य होणार नाही. संरक्षण दलांनी पाकिस्तानातील नागरिकांना इजा होऊ न देता आपले लक्ष्य गाठले आहे. गोपनीय माहिती सरकार प्रसारित करू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी 'ऑपरेशन सिंदूर'ची संपूर्ण माहिती समोर येईपर्यंत थांबावे, असे ते म्हणाले. पाकिस्तानला तुर्कीच्या मिळालेल्या पाठिंब्यावर सहस्रबुद्धे म्हणाले की, अधिकांश इस्लामिक देश आता भारताची ओळख पटवत आहेत आणि आपल्या पंतप्रधानांचा सन्मान करत आहेत. तुर्कीच्या भूमिकेवर योग्य पातळीवर काम सुरू आहे. त्याला सहजपणे मोकळीक देता येणार नाही. वेळ आल्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. सहस्रबुद्धे यांनी भारताच्या आर्थिक स्थैर्याबाबतही मत व्यक्त केले.
स्थानिक निवडणुकीत भाजपला यश मिळेल!
महाराष्ट्रातील २४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत सहस्रबुद्धे म्हणाले की, भाजपला राज्यातील विधानसभेप्रमाणेच या निवडणुकांमध्येही मोठे यश मिळेल, असा विश्वास आहे. 'महायुती'सोबत भाजप लढणार का या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे, भाजप बहुधा युती करून लढेल. याआधीही, २०१७ मधील ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगळे लढले होते. त्यामुळे भाजप प्रत्येक स्थानिक निवडणुकीत युतीनेच लढेल, असे गृहीत धरता येणार नाही. महायुतीतील एकतेचा अभाव आणि महाराष्ट्रातील राजकीय अस्थैर्याबाबत सहस्रबुद्धे म्हणाले, महायुती स्थिर होण्यासाठी थोडा वेळ लागेल, मात्र लवकरच सर्व काही सुरळीत होईल.