प्रतिनिधी/मुंबई
केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “मला अमित शहांना सांगायचे आहे की, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकपच्या अंतिम सामना हरला. तसे पुत्रप्रेम तर मी दाखवले नाही. शिवसेना किंवा राष्ट्रवादी आम्ही फोडली नाही, असे अमित शहा म्हणतात. पण अमित शहा आणि त्यांचे चेलेचपाटे यांच्यात एकवाक्यता असली पाहिजे. मी परत येईन, पण हे दोन पक्ष फोडून परत आलो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तुमची लाज तुमचे चेलेचपाटे काढत आहेत, अशी टीका उद्धव यांनी केली.
“आमच्यासाठी दक्षिण मध्य मुंबईचा विषय संपला आहे. त्यावर आता चर्चा नाही. तसेच सांगलीत देखील महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एखाद्या व्यक्तीचा महत्वाकांक्षेचा विषय असेल तर पक्ष पाहून घेईल. पण प्रत्येक पक्षाचे नेतृत्व खंबीर असावे लागते. आपण जेव्हा आघाडी करतो, तेव्हा जागांची देवाणघेवाण या गोष्टी कराव्याच लागतात. आम्ही कोल्हापूर ही जिंकलेली जागा सोडली. सातत्याने जिंकून यायचो त्या रामटेक, अमरावती या जागाही सोडल्या,” असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसला मुंबईत कमी जागा मिळाल्याची भावना मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईचा विषय आता संपल्याचे सांगितले. सांगलीत देखील ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी विश्वजीत कदम यांची मागणी आहे. त्यावर बोलताना उदधव ठाकरे म्हणाले, “प्रत्येक पक्षाचे नेत़त्व खंबीर असावे लागते. आम्ही देखील कोल्हापूर ही जिंकलेली जागा काँग्रेससाठी सोडली. रामटेक,अमरावती या जिंकत आलेल्या जागा आम्ही सोडल्या. आपण आघाडी करतो तेव्हा काही जागांच्या देवाणघेवाणीच्या गोष्टी कराव्या लागतात. पक्षाच्या नेत्याने हे कार्यकर्त्यांना समजावून सांगायला हवे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पनवेलकरांची दुहेरी मालमत्ता करातून मुक्तता करणार
कल्याण-डोंबिवली येथील लोढांच्या पलावा सिटीला मालमत्ता करातून वगळले आहे, तर दुसरीकडे पनवेलकरांकडून सिडकोमार्फत मालमत्ता कर आकारला जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सेवा न देता पनवेल महापालिकेकडूनही कर वसूली केली जात आहे. ही दुहेरी करवसूली म्हणजे जुलूमशाही आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर मुंबईप्रमाणे पनवेलकरांची दुहेरी मालमत्ता करातून मुक्तता करणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.