जूनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा १०८ टक्के पडणार; महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज

देशात मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी झालेले असतानाच जूनमध्ये सरासरीपेक्षा १०८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केला आहे. ज्यामुळे देशाच्या बहुतेक भागात तापमान नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा १०८ टक्के पडणार; महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज
ANI
Published on

नवी दिल्ली : देशात मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी झालेले असतानाच जूनमध्ये सरासरीपेक्षा १०८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केला आहे. ज्यामुळे देशाच्या बहुतेक भागात तापमान नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव एम. रविचंद्रन म्हणाले की, यंदा दीर्घकाळात १०६ टक्के (८७ इंच) पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले की, यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा आदी परिसरात चांगला पाऊस पडेल. देशातील शेती ही पावसावर अवलंबून आहे, तर वायव्य भारतात साधारण मान्सून राहण्याची शक्यता आहे, तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. मध्य व दक्षिण भारतात सरासरीपेक्षा चांगला पाऊस राहील, असे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी सांगितले.

लडाख, हिमाचल प्रदेशच्या लगतचे भाग, ईशान्येकडील राज्ये आणि बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओदिशाचा काही भाग वगळता देशाच्या बहुतेक भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पंजाब, हरयाणा, केरळ आणि तमिळनाडूमधील काही तुरळक भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने सांगितले.

यंदा दक्षिण नैऋत्य पाऊस २४ मे रोजी केरळात दाखल झाला. २००९ नंतर पहिल्यांदाच पाऊस भारतात दाखल झाला, तर मुंबईत १६ दिवस आधीच पाऊस आला आहे. १९५० नंतर पहिल्यांदाच असे घडले.

दरवर्षी १ जूनला पाऊस केरळात, तर मुंबईत तो ११ जून येतो. संपूर्ण देशात तो ८ जुलैपर्यंत पसरतो. १७ सप्टेंबरनंतर तो माघार घ्यायला प्रारंभ करतो. १५ ऑक्टोबर तो पूर्णपणे भारतातून जातो.

मान्सून केरळ किंवा मुंबईत लवकर दाखल झाला याचा अर्थ तो देशाच्या विविध भागात आला, असे होत नाही. यासाठी जागतिक, विभागीय व स्थानिक बाबी लक्षात घ्याव्या लागतील.

२०२४ मध्ये भारतात ९३४.८ मिमी (१०८ टक्के) २०२३ मध्ये ८२० मिमी, (९४.४ टक्के), २०२२ मध्ये ९२५ मिमी, २०२१ मध्ये ८७० मिमी, तर २०२० मध्ये ९५८ मिमी पाऊस पडला होता, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले.

शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा

भारताचा मान्सून हा शेतीशी संबंधित अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतीला पाणी, पिण्याचे पाणी, जलविद्युत निर्मितीसाठी पाऊस आवश्यक आहे. देशातील ४२ लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे जीडीपीचे प्रमाण १८.२ टक्के आहे.

logo
marathi.freepressjournal.in