मुंबई/पुणे/छत्रपती संभाजीनगर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची जखम ताजी असतानाच भारत-पाक क्रिकेट सामन्याला केंद्र सरकारने परवानगी दिल्याने देशभरातून या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून याविरोधात रविवारी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले.
मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, भिवंडी, छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात आंदोलन करत अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी यावेळी टीव्हीची तोडफोड केली. तसेच शिवसेनेच्या रणरागिणींनी ठिकठिकाणी आंदोलन करत सिंदूरच्या डब्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवत निषेध नोंदवला. पहलगाममध्ये काही महिन्यांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. यात २६ नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेला काही महिने उलटले असताना, आता भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा देशभरातून तीव्र निषेध केला जात आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राज्यभरात सर्व ठिकाणी आंदोलनासाठी मोठ्या संख्येने रणरागिणी जमल्या व त्यांनी पाकिस्तान आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधान मोदी यांना सिंदूर पाठवले. पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट सामन्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेकडून ‘माझे कुंकू, माझा देश’ हे आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे काही क्रिकेटप्रेमींनी भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना आणि होमहवन केले.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीने रविवारी करीरोड नाका येथे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. त्यानंतर मुंबई विभाग क्रमांक-११ च्यावतीने राज्यव्यापी आंदोलन झाल्यानंतर सेनाभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुंकू व सौभाग्याची ओटी पाठवण्यासाठी खासदार अनिल देसाई यांच्याकडे ती सोपवण्यात आली. या आंदोलनात विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही सहभागी झाले होते. “आता गरम सिंदूर थंड झाले का?,” असा संतप्त सवाल शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी केला. याप्रसंगी सचिव साईनाथ दुर्गे, उपनेते किशोरी पेडणेकर, दिनेश बोभाटे, राकेश देशमुख, अनुपमा परब, विनिता चव्हाण व माई आरोलकर उपस्थित होत्या.
केंद्र सरकारला सुबुद्धी येवो!
कोल्हापुरात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. अंबाबाई मंदिर परिसरात आरती करून केंद्र सरकारला सद्बुद्धी यावी, असे साकडे घालण्यात आले.
ठाण्यातही विरोध
ठाण्यातील चंदनवाडी येथील शिवसेना शाखेबाहेर अनेक महिला आणि पदाधिकारी जमा झाले होते. शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी पाकिस्तान आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधान मोदी यांना सिंदूर पाठवले.
भिवंडीत माझा देश, माझं कुंकू आंदोलन
भिवंडी शहरात शिवसेना महिला आघाडीच्या लोकसभा संपर्कप्रमुख आशा रसाळ, उपनेते विश्वास स्थळे, भिवंडी महिला जिल्हा संघटिका वैशाली मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व महिलांनी कुंकवाची डबी पेटीमध्ये एकत्रित करून आपला संताप व्यक्त केला. ही कुंकवाची पेटी मोदी यांना पाठवण्यात आली.
पुणे, छत्रपती संभाजीनगरात निषेध
पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही जोरदार आंदोलन करण्यात आले. पुण्यातील लाल महाल चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आंदोलन केले. दहशतवादी हल्ल्यात अनेक माता-भगिनींचे कुंकू पुसले असतानाही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी सरकारचा कडाडून निषेध केला. छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आंदोलन करत पंतप्रधान मोदींना सिंदूरचा डबा भेट पाठवला.
सामना खेळवणे हा सरकारचा निर्णय - गावस्कर
टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले की, आमच्या सरकारने हा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यात खेळाडू काहीही करू शकत नाही. बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणत्याही संघाला प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळावेच लागते. द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही. त्यामुळे तुमच्या-आमच्या बोलण्याने काहीही फरक पडणार नाही. खेळाडू आणि बीसीसीआयला सरकार जे म्हणत आहे ते स्वीकारावे लागेल.