मुंबई: इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाच्या विषयावर भारताने दुतोंडी भूमिका न घेता ठाम भूमिका घ्यावी व सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात याबाबत शांततेचा ठराव पास करून जगाला एक नवी दिशा द्यावी. त्यासाठी काँग्रेस व समाजवादी पार्टीने महत्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आझाद मैदानातील भव्य शांती जनसभेच्या वेळी आवाहन केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आझाद मैदानात शुक्रवारी शांती सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या जनसमुदायापुढे बोलताना प्रश्न आंबेडकर म्हणाले, इस्राईल मनमानी मुळे तेथील रुग्णालये बॉम्बने उडवली जात आहेत. हजारो गर्भवती महिलांना रुग्णालयात जाता येत नाही. हे किती मोठे पाप आहे. येणारी भावी पिढी या मनमानीला माफ करणार नाही. याबाबत भारताने ठाम भूमिका घेतली, तर जगात एक वेगळा संदेश जाईल. पॅलेस्टाईन नागरिकांना न्याय मिळेल. त्यासाठी काँग्रेस व समाजवादी पार्टीने महत्वाची भूमिका बजावत सर्वधर्मसमभाव दाखवत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक व्हावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
इस्राईलच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका व केंद्रीय मुख्य सचिव यांनी सरकारची मांडलेली भूमिका वेगवेगळी आहे. त्यामुळे जनता संभ्रमात आहे. सामान्य नागरिक भयभीत झाला आहे. राजकीय पुढारी व त्यांचे पक्ष दुहेरी भूमिकेत आहेत. त्यांचा खरा चेहरा बाहेर येत नाही त्यामुळे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात भारताने ठाम भूमिका जगासमोर आणावी. भारत नक्की कोणाच्या बाजूने आहे हे तरी कळेल, असे आंबेडकर म्हणाले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
आझाद मैदानातील या कार्यक्रमास पोलिसांनी अगोदर परवानगी नाकारली होती. मुस्लिम सभा व आझाद मैदान हे समीकरण रजा अकादमीच्या आंदोलनानंतर वादग्रस्त ठरले असल्याने पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. हा फक्त मुस्लिम समाजाचा प्रश्न नाही तर मानवजातीचा प्रश्न आहे. असे सांगितल्यावर परवानगी मिळाली. ही जनशांती सभा आहे, त्यामुळे भारत सरकारने या जनसमुदायाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, असे आंबेडकर म्हणाले.