
मुंबई : शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावणे, नागरिक, शासन व प्रशासन यांच्यातील विश्वास वाढवणे यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखून दिला होता. या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत मंत्री आदिती तटकरे यांच्या महिला व बालविकास खात्याने बाजी मारत पहिला नंबर पटकावला आहे. दरम्यान, १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून विजेत्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
अन्य मंत्र्यांच्या खात्यांनी चांगली कामगिरी केलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील सामान्य प्रशासन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील नगर विकास व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारितील अन्न व नागरी पुरवठा खात्याचा नियोजनशून्य कारभार समोर आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारितील ४८ विभागांना १०० दिवसांचा कार्यक्रम आखून दिला होता. कुठल्या विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली याची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या भारतीय गुणवत्ता परिषद या संस्थेची निवड करण्यात आली होती. या संस्थेमार्फत या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. वेबसाइट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले. ही मोहीम म्हणजे केवळ व्यवस्थापन नाही, तर उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब आहे. या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गेल्या १०० दिवसांत या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (७८ टक्के) पूर्णतः साध्य केली आहेत, तर उर्वरित १९६ उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील. एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी १०० टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे, तर आणखी १८ विभागांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. या यादीत चंद्रपूर, ठाणे, पुणे, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, पालघर, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अकोला या जिल्ह्यांतील कार्यालयांनी लक्षणीय गुण मिळवत इतरांसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे.