शत्रू भारताचे काहीही वाकडे करू शकणार नाही; ‘भेंडवळ’च्या घटमांडणीची भविष्यवाणी, यंदा भरपूर पावसाचा अंदाज

बुलढाणा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी, नागरिकांचे लक्ष वेधलेल्या भेंडवळ येथील घटमांडणीचे बहुप्रतीक्षित भाकीत गुरुवारी जाहीर करण्यात आले.
शत्रू भारताचे काहीही वाकडे करू शकणार नाही; ‘भेंडवळ’च्या घटमांडणीची भविष्यवाणी, यंदा भरपूर पावसाचा अंदाज
एक्स @airnews_arngbad
Published on

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी, नागरिकांचे लक्ष वेधलेल्या भेंडवळ येथील घटमांडणीचे बहुप्रतीक्षित भाकीत गुरुवारी जाहीर करण्यात आले. चंद्रभान महाराज यांचे वंशज असलेले सारंगधर महाराज व पुंजाजी महाराज यांनी घटमांडणी स्थळाचे व घट, त्यातील पदार्थ, धान्याची स्थिती लक्षात घेऊन हे भाकीत जाहीर केले. शत्रू भारताचे काहीही वाकडे करू शकणार नाही आणि यंदा पावसाळा भरपूर असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

यावेळी घटातील शत्रूचे प्रतीक असलेले मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले. त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. परंतु करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था असलेले हे धान्य शाबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही. परंतु देशावर संकट असल्याने 'राजा'वर प्रचंड ताण राहील. देशाच्या तिजोरीत खडखडाट असेल, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.

युद्ध झालेच तर यावेळी महायुद्ध

पाकिस्तानसोबत सुरू असलेले सध्याचे शाब्दिक युद्ध खरोखरच्या युद्धामध्ये बदलण्याची शक्यता कमी आहे. मात्र, युद्ध झाल्यास यावेळेस महायुद्ध होईल, अशी भविष्यवाणीही वर्तविण्यात आली आहे.

यंदा उत्तम पावसाळा

त्याशिवाय यावर्षी पावसाळा उत्तम असून जूनमध्ये सर्वसाधारण, जुलैमध्ये भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये साधारण पाऊस तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस बरसणार आहे. अवकाळी पावसाचेसुद्धा थैमान राहील. त्याचबरोबर पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहील.

करव्यावरील पुरी गायब असल्याने पृथ्वीवर प्रचंड संकटे येतील. त्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तींचा सहभाग असू शकतो. पिकांच्या उत्पन्नाची अनिश्चितता असून भावातही तेजी-मंदी राहील. कुठे कमी तर कुठे जास्त पीक येईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडीसुद्धा होईल आणि पिकांवर रोगराई पसरेल, असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडणीत वर्तवला आहे.

धोकादायक बाब म्हणजे यंदा देशात रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे. पिकाबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे सांगण्यात आली आहे. मात्र, उत्पन्न चांगले असले तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदा वर्तवण्यात आले आहे.

दरम्यान, घटामध्ये मांडलेल्या १८ धान्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झालेले आढळून आले, त्यावरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली. भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासूनच तळ ठोकून होते.

logo
marathi.freepressjournal.in