

पुणे : पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलच्या समारोपावेळी ‘विकसित भारताचे चार स्तंभ’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'भारतीय अर्थव्यवस्था ही चार स्तंभांवर प्रगती करत आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, उत्पादकता, कायद्यामध्ये झालेली सुधारणा आणि सर्वसमावेशक वाढ या चार घटकांचा समावेश आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळत असल्यामुळे भारताच्या प्रगतीचा आलेख हा उंचावत आहे. भारतामध्ये तरुण मंडळींची संख्या अधिक आहे, त्यामुळे भविष्यात विकासाचा वेग वाढतच जाणार आहे.'
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या काळे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विश्वास, गुणवत्ता आणि स्थैर्य या त्रिसूत्रीच्या जोरावर २०४७ पर्यंत भारताला १० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे शक्य होणार असल्याचे मत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केले. नजीकच्या भविष्याच्या दृष्टीने सामाजिक क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवर (पब्लिक पॉलिसी) पुणे शहरात विचारविनिमय व्हावा, या उद्देशाने शहरातील युवा तज्ज्ञ व उद्योजकांनी एकत्र येत या दोन दिवसीय पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. ‘नजीकच्या भविष्यात भारताची १० ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेविषयक कल्पना’ ही या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना होती. महोत्सवाचे आयोजक असलेले सिद्धार्थ देसाई, इंद्रनील चितळे, साहिल देव, ऋग्वेद देशपांडे हे देखील यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, उद्योजक, व्यावसायिक यांसोबतच धोरण विषयातील तज्ज्ञ, धोरण निर्माते यांनीही यावेळी महोत्सवाला हजेरी लावली होती.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात रेल्वेचा जेवढा विस्तार झाला, त्याच्या कित्येकपट अधिक विकास २०१४ ते २०२४ या काळात सत्तेमध्ये असणाऱ्या मोदी सरकारने केला आहे. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात ३१ हजार किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आले. याच काळात ७५ नवीन विमानतळे सुरू झाली. पायाभूत सुविधांचा विकास करताना सरकारने लहान शहरांमध्ये असणाऱ्या रेल्वे स्थानकांचा विकास करण्यास प्राधान्य दिले असल्याचेही वैष्णव यांनी नमूद केले.
पुण्यात पुणे स्टेशनच्या व्यतिरिक्त खडकी, हडपसर आणि उरळी या ठिकाणी स्थानके विकसित करण्यात येणार आहेत. उरळीमध्ये रेल्वेचे मेगा टर्मिनल तयार करण्यात येणार असून त्या ठिकाणी रेल्वे गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात एक लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक
केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असणाऱ्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामुळे मुंबई, ठाणे, वापी, सुरत, अहमदाबाद या शहरांची अर्थव्यवस्था अधिक बळकट होणार आहे. रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये एक लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. देशातील एक हजार ३३४ रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून त्यापैकी १३२ स्थानके ही महाराष्ट्रामधील असल्याचे वैष्णव म्हणाले.
मोदी सरकारचे प्रमुख ध्येय
हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी १३६ कोटी तर खडकीसाठी ३६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या पुणे स्थानकाच्या इमारतीला कोणताही धक्का न लावता त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या बरोबरच देशात अनेक नवीन बदल घडत आहेत. तंत्रज्ञान अधिक विकसित होत चालले आहे. ते प्रत्येकापर्यंत पोहचवणे हेच मोदी सरकारचे प्रमुख ध्येय आहे. भारत हा तरुणांचा देश आहे, त्यामुळे उच्च अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठणे शक्य होणार असल्याचे त्यांनी म्हटले.