

कोल्हापूर : कोल्हापूरच्या हवाई सेवेला आणखी बळ मिळाले असून धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांतून इंडिगो एअरलाईन्सची कोल्हापूर-नवी मुंबई-कोल्हापूर ही नवी विमानसेवा रविवारपासून सुरू झाली आहे. दिवसातून दोन वेळा उपलब्ध होणाऱ्या या सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उड्डाण (UDAN) योजनेअंतर्गत देशातील शहरांना हवाई सेवेद्वारे जोडण्याच्या उपक्रमात कोल्हापूरचाही समावेश झाला आहे. त्यानुसार कोल्हापूर विमानतळाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण सातत्याने सुरू असून विविध शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढत आहे. या नव्या विमानसेवेचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पहिल्या विमानातून आदिती तटकरे यांच्यासह इतर प्रवासी कोल्हापुरात दाखल झाले. तसेच डॉ. विजय दर्डा यांच्यासह काही प्रवासी मुंबईकडे रवाना झाले. सर्वांचे स्वागत खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
या शुभारंभ प्रसंगी कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, अधिकारी अनिल श्रीवास्तव, राजेश अहिरवार, बेनू नायक, अंकित व्यास, रविराज लामकाने, राजेश पेडणेकर तसेच इंडिगो एअरलाईन्सचे अधिकारी उपस्थित होते.
प्रवाशांची समाधानाची भावना
या सेवेअंतर्गत इंडिगोचे विमान दररोज सकाळी ८ वाजता नवी मुंबईहून उड्डाण करून ९:१५ वाजता कोल्हापुरात दाखल होईल. त्यानंतर ९:३५ वाजता कोल्हापूरहून नवी मुंबईकडे उड्डाण करून १०:२५ वाजता पोहोचेल. सायंकाळी ७:२० वाजता नवी मुंबईहून सुटणारे विमान ८:३० वाजता कोल्हापुरात येईल, तर ८:५० वाजता परतीचे उड्डाण घेऊन १०:३५ वाजता नवी मुंबईत पोहोचेल. पहिल्याच दिवशी ६७ प्रवासी कोल्हापुरात दाखल झाले, तर ६५ प्रवासी मुंबईकडे रवाना झाले. या नव्या सेवेमुळे मुंबईतील कामे आटोपून अवघ्या तासाभरात कोल्हापुरात परत येण्याची सुविधा उपलब्ध झाली असून प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
दिवसातून दोन वेळा सुरू असलेली ही सेवा मुंबईला वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची ठरेल. यामुळे वेळेची बचत होईल, तसेच उद्योग-व्यवसाय आणि पर्यटनालाही चालना मिळेल.
- धनंजय महाडिक, खासदार