पुणे : गेल्या काही दिवसांपासून सेवा आणि वेळापत्रकातील अव्यवस्थेमुळे टीकेचा धनी ठरत असलेल्या इंडिगो एअरलाइन्सचा गोंधळ पुणे विमानतळावरही चव्हाट्यावर आला आहे. वैमानिकांची कमतरता, मनुष्यबळातील तुटवडा आणि ‘पार्किंग बे’ उपलब्ध न राहिल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दोन दिवसांत तब्बल ३६ उड्डाणे रद्द करावी लागली, तर अनेक उड्डाणे तासन्तास विलंबाने चालली. एवढेच नाही, तर नागपूर-पुणे मार्गावरील गुरुवारी रात्रीचे विमान पुण्याऐवजी थेट हैदराबादमध्ये उतरवण्यात आले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. उशीर झालेल्या उड्डाणांच्या प्रवाशांना अल्पोपहार आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातील.
पुणे विमानतळावर गोंधळाची मालिका
बुधवारी रात्रीपासून इंडिगोची सेवा अक्षरशः कोसळली. वैमानिकांची कमतरता आणि मनुष्यबळ कमी असल्याने अनेक उड्डाणे विलंबीत झाली होती. पार्किंग बे न मिळाल्याने विमानांना जमिनीवर थांबवणे कठीण झाले. पुण्यासह दिल्ली व कोलकात्यातही इंडिगो सेवेचा गोंधळ कायम होता. प्रवासी खोळंबून राहिल्याने विमानतळावर परिस्थिती बिकट झाली होती.
नागपूर–पुणे विमान थेट हैदराबादमध्ये!
गुरुवारी रात्री नागपूरहून पुण्याला येणारे विमान पुणे विमानतळावरील ‘पार्किंग बे’ उपलब्ध नसल्याने हैदराबादला वळवावे लागले. यामुळे दुसऱ्याच शहरात उतरवलेल्या प्रवाशांनी इंडिगोच्या व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेतली आहे.
इंडिगोच्या गैरव्यवस्थापनाबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. मंत्रालयात नियंत्रण कक्ष उभारला असून परिस्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परिस्थिती सामान्य करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. एक-दोन दिवसांत सेवा स्थिर, तर तीन दिवसांत पूर्णपणे सामान्य होतील.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
केंद्र सरकारकडून दिलासा
उड्डाण रद्द झाल्यास पूर्ण परतफेड स्वयंचलितपणे केली जाईल. विमान उशिरा असल्यास अल्पोपहार व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. अडकलेल्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये निवासव्यवस्था केली जाईल. ज्येष्ठ नागरिकांना आराम खुर्ची व विशेष सुविधा देण्यात येतील. मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे.