इंद्रायणी पूल दुर्घटना; शोधमोहीम थांबवली

मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर रविवारपासून सुरू असलेली शोधमोहीम अखेर सोमवारी सायंकाळी ६ वाजता थांबवण्यात आली. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५१ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने मृतांचा आकडा वाढलेला नाही. दरम्यान, जखमींपैकी ३५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
इंद्रायणी पूल दुर्घटना; शोधमोहीम थांबवली
Published on

पुणे : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर रविवारपासून सुरू असलेली शोधमोहीम अखेर सोमवारी सायंकाळी ६ वाजता थांबवण्यात आली. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५१ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने मृतांचा आकडा वाढलेला नाही. दरम्यान, जखमींपैकी ३५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कुंडमळा येथील पूल दुर्घटनेनंतर रविवार दुपारी ३.३० वाजता सुरू झालेले बचावकार्य तब्बल २५ तासांनंतर संपले. बचाव पथकांनी बोटीद्वारे इंद्रायणी नदीचे शेवटचे निरीक्षण केले असून, दिवसभरात नदीपात्रात कोणतीही व्यक्ती आढळली नाही. मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी सोमवारी सायंकाळी ६ वाजता बचावकार्य थांबवल्याची माहिती दिली. या शोधमोहिमेत अनेक संस्था आणि अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये वन्यजीव संस्था, आपदा मित्र, तसेच रोहा व महाड येथील आपत्ती व्यवस्थापन संस्था यांनी भाग घेतला.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) या बचावकार्यात ३८ जणांना वाचवले. दुर्घटनाग्रस्त पुलाचा पाण्यात कोसळलेला भागही शोधमोहिमेदरम्यान बाहेर काढण्यात आला. सकाळी ११ वाजता कुंडमळ्यामध्ये २०० ते ३०० मीटर अंतरावर सखोल शोधमोहीम राबवण्यात आली. स्थानिक जीवरक्षक संस्थेकडूनही ‘सर्च ऑपरेशन’ करण्यात आले. या शोधमोहिमेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनचाही उपयोग करण्यात आला. तहसीलदार आणि प्रांताधिकारी स्वतः या शोधमोहिमेत सहभागी झाले होते.

मृतांमध्ये ३ पुरुष व एका बालकाचा समावेश

चार मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. यापैकी तिघा मृतांची ओळख पटली आहे. दुर्घटनेतील ५१ जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in