तीळ-गुळाच्या गोडव्यावर महागाईची 'संक्रांत'; तीळ २०० ते २२० रुपयांपर्यंत, गुळाचा भाव ५० ते ६० रुपये प्रतिकिलो

कॅलेंडर नव्या वर्षातील येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकरसंक्रांतनिमित्त तीळ आणि गुळाला अधिक महत्त्व दिले जाते.
तीळ-गुळाच्या गोडव्यावर महागाईची 'संक्रांत'; तीळ २०० ते २२० रुपयांपर्यंत, गुळाचा भाव ५० ते ६० रुपये प्रतिकिलो
Published on

भास्कर जामकर/नांदेड

कॅलेंडर नव्या वर्षातील येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकरसंक्रांतनिमित्त तीळ आणि गुळाला अधिक महत्त्व दिले जाते. प्रत्येक घरी एकमेकांना तिळगुळ घ्या... गोड गोड बोला म्हणत तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे सण साजरा करण्यासाठी तीळ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. यात तिळाची किंमत २० टक्क्यांपर्यंत वधारली आहे. सध्या एक किलो तिळासाठी किलोमागे २०० ते २२० रुपये मोजावे लागत आहेत.

नात्यातील गोडवा वाढविणाऱ्या या सणाला महागाईची झळ लागली आहे. गेल्यावर्षी तीळ १५० ते १६० रुपये किलो दराने मिळत होते. यंदा तिळाच्या दरात तब्बल ४० रुपये किलो दरवाढ झाली आहे. या वार्षिक भाव वाढीसह संक्रांत सण तोंडावर आलेला असताना

तिळाचा दर अजून ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. एकीकडे तिळाचे दर वाढलेले असतानाही तीळ व गुळाची खरेदी होताना दिसत आहे. संक्रांत सणानिमित्त महिलांची सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. किराणा दुकानासह खुल्या पद्धतीने रस्त्यावर बसलेल्या तीळ व गूळ विक्रेत्यांकडे महिलांची गर्दी दिसत आहे. दर वाढलेले असले तरी तीळ व गूळ खरेदीवर कोणताही परिणाम दिसून येत नाही.

मुबलक उत्पन्नाची शाश्वती नसल्याने टाळाटाळ

तीळ पेरणी आणि काढणी त्यातून मुबलक उत्पन्न मिळेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात तिळाचे उत्पन्न घेण्यास टाळाटाळ करतात. यंदा २०० ते २२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्याचबरोबर तिळासोबत लागणारा गूळही ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. तिळासाठी लागणारा हलवा ही महागला आहे, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

इतर राज्य तिळाचे उत्पन्न घेण्यास आघाडीवर आहेत. त्यामुळे बाहेर राज्यातील तीळ बाजारात असल्याचे दिसते. बाजारात आवक कमी व मागणी वाढल्यामुळे तिळाच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आदी राज्यातून तिळाची आवक होते.

- निलेश भंडारी, व्यापारी

logo
marathi.freepressjournal.in