नागपूर : दिवसेदिवस राज्यामध्ये गिधाडांची संख्या कमी होत चालली आहे आणि आता तर ही संख्या इतकी कमी झाली आहे की गिधाडांच्या प्रजाती जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर गिधाडांच्या संवर्धनासाठी नागपूर येथे जटायु ग्राम मित्र या नावाने नवीन प्रकल्प आजपासून सुरू करण्यात आला आहे.
प्रामुख्याने मांस भक्षणावर अवलंबून असलेल्या गिधाडांची संख्या अन्नाअभावी झापाट्याने लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्याने या प्रकल्पाद्वारे त्यांना अन्न उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी आणि पेंच व्याघ्र प्रकल्प यां दोहोंच्या संयुक्त विद्यमाने जटायु ग्राम मित्र योजना राबविण्यात येणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी आधीपासूनच गिधाडांचे संवर्धन आणि पूनर्वसनासाठी काम करीत आहे. आता या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहभागातून गिधाडांना वाचवण्याच्या कामाल गती मिळेल, असे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभूनाथ शुक्ला यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
गावपातळीवर आता मोठया प्रमाणावर बदल होऊ लागले आहेत़ पूर्वी गावात मेलेल्या जनावरांना गावाबाहेर दूर मोकळ्या जागेवर नेऊन टाकत असत. त्यामुळे गिधाडांना हे मांस भक्षण करता येत असे. परंतु आता तसे होत नसल्यामुळे गिधाडांना अन्न सहज उपलब्ध होत नाही. परिणामी गिधाडांच्या संख्येत घट होऊ लागली़ या प्रकल्पांतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या आतल्या भागात काही ठरवून दिलेल्या जागांवर गावातील मृत जनावरांची शवे आणून ठेवण्यात येतील. जेणे करून गिधाडांना निश्चित ठिकाणी त्यांचे अन्न मिळेल. गावापासून प्रकल्पाच्या ठिकाणी मृत जनावरांना आणण्यासाठी लोकांना जो खर्च येईल तो त्यांना परत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गिधाडांसाठी अन्न उपलब्ध करून देत असताना आवश्यक ती खबरदारीही घेतली जाणार आहे़ त्यासाठी केवळ वृद्वपणाने किंवा आजार झाल्याने मृत झालेल्या जनावरांचे मांसच या ठिकाणी ठेवले जाईल. जनावरांवर कोणत्याही प्रकरचे औषधोपचारा झालेले नाहीत ना, याची खातरजमा केल्यानंतरच त्यांचे शव खाद्य म्हणून प्रकल्पाच्या ठिकाणी ठेवण्यात येईल.
या प्रकल्पाचा भाग म्हणून हरियाणातील पिंजोर मधल्या जटायु संवर्धन आणि प्रजनन केंद्रातून भारतीय प्रजातीच्या दहा गिधाडांना पेंच प्रकल्पातल्या पक्षीगृहात आणून ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जंगलात सोडून देण्यात आले़ ७ सप्टेंबर हा गिधाडे संवर्धन दिन म्हणून पाळला जात असतो. या दिवसाचे औचित्य साधून हा प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.